आमदाराला भाजपकडून 30 कोटींची ऑफर 

वृत्तसंस्था
गुरुवार, 4 जुलै 2019

आमदारांना खरेदी करून सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करणे अयोग्य आहे. लोकशाही शासनव्यवस्थेला अशा गोष्टी मारक आहेत. आमदारांना खरेदी करून सरकार स्थापन करण्याची धडपड करण्यापेक्षा दुष्काळाने होरपळणाऱ्या जनतेला यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्याची गरज आहे. 
- रमेश बाबू, जेडीएसचे प्रवक्ते 

बंगळूर : कर्नाटकातील कॉंग्रेस-जेडीएस सरकारचे पतन व संरक्षणासाठी सत्ताधारी व विरोधी पक्षाकडून डाव-प्रतिडाव सुरू असतानाच जेडीएसचे परियापट्टणचे आमदार के. महादेव यांनी बुधवारी भाजपवर गंभीर आरोप केला. आमदारपदाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी भाजप नेत्यांनी मला 30 ते 40 कोटींची ऑफर दिल्याचे ते म्हणाले. एवढेच नाही, तर कॉंग्रेसचे बंडखोर आमदार रमेश जारकीहोळी यांनी माझ्यासमोरच 80 कोटींची मागणी केल्याचा दावाही त्यांनी केला. 

के. महादेव यांनी परियापट्टण येथील एका सभेत भाजपवर ऑपरेशन कमळचा आरोप केला. ते म्हणाले, की भाजपचे नेते माझ्याकडे तीन वेळा पैसे घेऊन आले होते. परंतु, ते मी स्वीकारले नाहीत. मला पैशापेक्षा पक्ष, मतदारसंघाचा विकास महत्त्वाचा आहे. त्यामुळे त्यांना परत जावे लागले. रमेश जारकीहोळी यांनी माझ्यासमोरच भाजप नेत्यांकडे ऑपरेशन कमळअंतर्गत 80 कोटींची मागणी केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. 

महादेव यांनी एका सार्वजनिक सभेत उघडपणे केलेल्या या आरोपामुळे त्यामधील खरे-खोटेपणा तपासून पाहण्याची मागणी होत आहे. सत्ताधारी व विरोधी पक्षाकडून आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनीही अशाच प्रकारचा आरोप केला होता. आपल्या पक्षाच्या आमदारांना भाजप नेत्यांकडून आमिष दाखविण्यात येत असल्याचे सांगून आपले पक्षनिष्ठ आमदार त्यांच्या आमिषाला बळी पडणार नसल्याचे त्यांनी म्हटले होते. 

जेडीएसचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी महादेव यांच्या आरोपावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. याबाबत आपणास काहीही विचारू नका, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. 

आमदारांना खरेदी करून सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करणे अयोग्य आहे. लोकशाही शासनव्यवस्थेला अशा गोष्टी मारक आहेत. आमदारांना खरेदी करून सरकार स्थापन करण्याची धडपड करण्यापेक्षा दुष्काळाने होरपळणाऱ्या जनतेला यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्याची गरज आहे. 
- रमेश बाबू, जेडीएसचे प्रवक्ते 

आमदार महादेव खोटे बोलत आहेत. भाजपकडून असे काही घडलेच नाही. हे खरे होते तर त्यांनी त्याचवेळी का तक्रार केली नाही? भाजपच्या कोणत्याच नेत्याने अशी ऑफर दिली नाही. 
- गो. मधुसूदन व सी. टी. रवी, भाजप नेते


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP offer to JDS MLA in Karnataka