esakal | Lakhimpur Kheri violence| भाजपकडून डॅमेज कंट्रोलला वेग; गृहराज्यमंत्र्याची खुर्ची धोक्यात
sakal

बोलून बातमी शोधा

Ashish Mishra

भाजपकडून डॅमेज कंट्रोलला वेग; गृहराज्यमंत्र्याची खुर्ची धोक्यात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

Lakhimpur Kheri violence| उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथील शेतकरी हत्याकांड प्रकरण दिवसेंदिवस तापत चाललेले असतानाच, भाजपच्या सर्वेसर्वा नेतृत्वाने उत्तर प्रदेशाचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्रदेव सिंह व संघटनमंत्री सुनील बन्सल यांना तातडीने दिल्लीत बोलावून घेतले आहे. भाजपाध्यक्ष जे पी. नड्डा व गरज पडल्यास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दोघांशीही चर्चा करून या प्रकरणाने भाजपला निवडणुकीच्या तोंडावर राजकीय फटका बसू नये यासाठीच्या संभाव्य आपत्ती निवारण उपायांवर मंथन करतील, असे दिसते. प्रकरण वाढले तर केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय ऊर्फ टेनी मिश्रा यांचे दिल्लीतील पदही जाऊ शकते, अशा ठोस हालचाली दिल्ली दरबारी आहेत. मिश्रा यांनी मागील आठवड्यात शहा यांच्याशी चर्चा केल्यावर त्यांची खुर्ची तत्कालिक वाचली होती.

या प्रकरणी कॉंग्रेस नेत्या प्रियांका वाड्रा यांच्यासह विरोधकांनी जबरदस्त दबाव निर्माण केल्यावर मिश्रा यांचे पुत्र आशिष यांना अटक करणे योगी आदित्यनाथ सरकारला भाग पडले. या प्रकरणी मिश्रा पितापुत्रांनी उलटसुलट वक्तव्ये करून पक्षाला मोठ्या अडचणीत आणले यावर राज्यातील पक्षनेत्यांचे जवळपास एकमत आहे. हत्याकांड घडले त्या रात्रीच (ता. ३) लखीमपूरकडे रवाना झालेल्या व अजूनही राज्यातच असलेल्या प्रियांका यांच्या उत्तर प्रदेशातील प्रत्येक कार्यक्रमाला लोकांचा जो उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे त्याबाबतही भाजपमध्ये २ मतप्रवाह आहेत. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसी मतदारसंघातील प्रियांका यांच्या सभेला किमान २५-३० हजारांची गर्दी जमल्याचे सांगितले जाते.

ज्या पक्षाची उत्तर प्रदेशातील संघटनाच जवळपास अस्ताला गेली आहे त्या पक्षाच्या महिला युवा नेत्याला मिळणारा हा प्रतिसाद भाजपसाठी धोक्याची घंटा समजावी, असे काही भाजप नेत्यांचे मत आहे. तर प्रियांका यांना मिळणारा प्रतिसाद कदाचित मतांमध्ये बदललाच तर त्याचा फटका भाजप नव्हे तर सपा नेते अखिलेश यादव यांना बसेल, असेही सांगितले जाते.

‘सकाळ’ला मिळालेल्या माहितीनुसार मंत्री मिश्रा मागील आठवड्यात गृहमंत्री शहा यांना भेटले तेव्हा त्यांना, तपासात सहकार्य करा, अशी तंबी मिळाली होती. आशिष यांना हात लावू देण्यास ते तयार नसल्याचे पाहून त्यांना, आशिष यांच्यावर कारवाई केली तरच जनक्षोम कमी होईल असे सांगून त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न दिल्ली दरबारी झाला. त्यानंतर मिश्रा त्यांना अभय मिळाल्याच्या थाटात लखीमपूर भागात परतले. मात्र, आता आशिष यांना अटक झाल्यानंतर व विरोधकांचा प्रचंड दबाव पहाता मिश्रा यांच्या राजीनाम्याची घटिका समीप येऊन ठेवल्याचे निरीक्षण दिल्लीत व्यक्त केले जाते.

loading image
go to top