'या' बैठकीत ठरेल का अमित शहांचा उत्तराधिकारी?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 जून 2019

भाजपमध्ये एक व्यक्ती एक पद असे धोरण अवलंबले जात असल्याने मंत्रिपद मिळाल्यानंतर अमित शहा हे भाजपध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा आहे. शिवाय भाजपध्यक्षपदी अमित शहा उत्तराधिकारी म्हणून कुणाची निवड करतील, याविषयी उत्सुकता आहे.

नवी दिल्ली : देशाचे गृहमंत्री अमित शहा लवकरच पक्ष संघटनेतील निवडणूकीबाबत बैठक घेणार आहेत. भाजपाध्यक्षपदी अमित शहा यांचा उत्तराधिकारी कोण असेल? ते या बैठीकीतून ठरण्याची चिन्हे आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली लोकसभा निवडणूकीत दणदणीत विजय मिळवून भाजपने सत्तास्थापन केली आहे. भाजपध्यक्ष अमित शहा यांनीही केंद्रात गृहमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. भाजपमध्ये एक व्यक्ती एक पद असे धोरण अवलंबले जात असल्याने मंत्रिपद मिळाल्यानंतर अमित शहा हे भाजपध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा आहे. शिवाय भाजपध्यक्षपदी अमित शहा उत्तराधिकारी म्हणून कुणाची निवड करतील, याविषयी उत्सुकता आहे. याच पार्श्वभूमीवर अमित शहा यांनी 13 आणि 14 जून दरम्यान विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली आहे. 

या बैठकीत पक्ष संघटनेतील निवडणूकीबाबत चर्चा होणार आहे. सर्व राज्यांतील संघटनांमध्ये या निवडणूका होतील. भाजपच्या राज्य संघटनच्या निवडणूका या पक्ष अध्यक्षांच्या निवडीपूर्वी होतात. यावेळी भाजपच्या सर्वच संघटन मंत्र्यांना बोलविण्यात आले आहे. मात्र काही महिन्यातच हरियाणा, महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यात विधानसभा निवडणूका आहेत, त्यामुळे या राज्यात पक्ष संघटनेच्या निवडणुका टाळण्यात येण्याची शक्यता आहे.  

भाजपच्या अध्यक्षपदासाठी माजी मंत्री जे. पी. नड्डा यांचे नाव आघाडीवर आहे. नड्डा यांचा मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने त्यांच्या निवडीची चर्चा आहे. सध्याचे भाजपध्यक्ष अमित शहा यांचा तीन वर्षांचा अध्यक्षीय कार्यकाळ या वर्षाच्या सुरवातीलाच समाप्त झाला होता. पण लोकसभा निवडणूकीमुळे हा कार्यकाळ वाढवून 6 महिन्याची मुदतवाढ देण्यात आली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP president Amit Shah has convened a meeting of its key leaders from states