अमित शहा मंत्रिमंडळात नाहीत! आधी करणार 'मिशन बंगाल' पूर्ण!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 मे 2019

- भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या प्रवेशाची शक्‍यता धूसर.

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील मंत्रिमंडळाच्या पहिल्या टप्प्यात भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या प्रवेशाची शक्‍यता धूसर असल्याचे पक्षसूत्रांचे म्हणणे आहे. "मिशन बंगाल' अद्याप पूर्ण झाले नसल्याने व पक्षसंघटनेसाठी तेवढे तोलामोलाचे नाव समोर येत नसल्याने मोदींनीही शहा यांचेबाबत तूर्त "जैसे थे' स्थिती ठेवण्याचे ठरविल्याचे समजते. अर्थात, याबाबत केवळ मोदी हेच अंतिम निर्णय घेणारे असल्याने अंतिम स्थिती उद्याच स्पष्ट होईल. 

मोदी व शहा यांच्यात संभाव्य मंत्रिमंडळाबाबत काल सुमारे पाच तास मॅरेथॉन चर्चा झाली. तीत प्रामुख्याने नवे चेहरे व घटकपक्षांना द्यावयाच्या जागा याबाबत खल झाला. उद्या (ता. 30) पहिल्या टप्प्यात मोदींसह सुमारे 40 मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्‍यता आहे. सायंकाळी सात वाजता राष्ट्रपती भवनात हा सोहळा होणार आहे. नव्या मंत्रिमंडळात पश्‍चिम बंगालच्या खासदारांची व महिलांची संख्या लक्षणीय राहण्याची स्पष्ट चिन्हे आहेत. शपथविधीपूर्वी पंतप्रधान मोदी राजघाट, अटलबिहारी वाजपेयी समाधी व इंडिया गेटवरील युद्धस्मारकाला भेट देऊन आदरांजली वाहतील.

शपथविधीच्या निमित्ताने ल्यूटन्स दिल्लीतील निम्मे रस्ते उद्या दुपारी चार ते रात्री 9 पर्यंत पूर्ण बंद राहणार असल्याने सर्वसामान्यांचे हाल होण्याची चिन्हे आहेत. शहा यांनी मोदींसह आज दुपारी पुन्हा तीन ते साडेतीन तास चर्चा केली. या बैठकीत मंत्र्यांची यादी जवळपास निश्‍चित झाली असून, उद्या सकाळी संबंधितांना कळविले जाईल. 

सरसंघचालक मोहन भागवत हेही दिल्ली मुक्कामी दाखल झाले असून, आज ते व संघनेते कृष्णगोपाल हे दोघेही शहा यांच्याबरोबर संभाव्य मंत्रिमंडळासह अन्य मुद्यांवर चर्चा करण्याची शक्‍यता आहे. उद्याच्या शपथविधीसाठी भागवत उपस्थित राहतील. संघाच्या सूत्रांनीही शहा यांना तूर्त पक्षाध्यक्षपदी कायम ठेवण्याच्या कल्पनेला दुजोरा दिला आहे. मात्र, यासाठी भाजपला आपल्या घटनेत बदल करावा लागेल व पक्षाध्यक्षपदाची संधी तीनदा देण्याची तरतूद करावी लागेल. पक्षाध्यक्षपदासाठी राजनाथसिंह व नितीन गडकरी यांच्या नावांबाबत विचार सुरू असला, तरी ते दोघे पुन्हा अध्यक्षपदी येण्यास इच्छुक नाहीत. 

दरम्यान, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज व गृहमंत्री राजनाथसिंह यांना पुन्हा तीच मंत्रिपदे दिली जाण्याची शक्‍यता आहे. अरुण जेटली उपलब्ध नसल्याने सध्या अर्थमंत्रालयाचा कार्यभार सांभाळणारे पियूष गोयल यांनाच ती जबाबदारी मिळणे शक्‍य आहे. मात्र, मोदी यांच्या "धक्कातंत्रा'नुसार राजकारणाच्या बाहेरील व्यक्तीला अर्थमंत्री नेमण्याचा "पी. व्ही. नरसिंहराव प्रयोग' होण्याचीही चिन्हे दिसतात.

गडकरी यांनी कृषिमंत्रिपद स्वीकारावे, असे पक्षनेतृत्वाचे म्हणणे आहे. मावळत्या मोदी सरकारविरुद्ध शेतकऱ्यांचा मोठा असंतोष आहे. राधामोहनसिंह यांना या पदाचा भार अजिबातच पेलता आला नव्हता. त्यामुळे गडकरी त्यांच्या स्वभावानुसार या खात्यात अमूलाग्र परिवर्तन घडवू शकतील, असे भाजप नेतृत्वाला वाटते. 

संभाव्य मंत्रिमंडळ 

जुने चेहरे : नितीन गडकरी, राजनाथसिंह, सुषमा स्वराज, स्मृती इराणी, प्रकाश जावडेकर, जितेंद्रसिंह, नरेंद्र तोमर, सुरेश प्रभू, जे. पी. नड्डा, मुख्तार अब्बास नक्वी, निर्मला सीतारामन, हंसराज अहीर (राज्यसभेवर निवड करणार), श्रीपाद येसो नाईक, राव इंद्रजित सिंह, अनुराग ठाकूर, अनुप्रिया पटेल, हरसिमरत कौर, रामदास आठवले. 

नवे चेहरे : मीनाक्षी लेखी किंवा प्रवेश वर्मा, जयंतकुमार रॉय, राजू सिंह बिश्‍त, शहानवाज हुसेन, गोपाळ शेट्टी, प्रधान बरूआ, शोभा करंदलजे, सुरेश धोत्रे (भाजप) अनिल देसाई किंवा अरविंद सावंत किंवा भावना गवळी (शिवसेना) आदी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP President Amit Shah may not in Cabinet Ministry of Modi Government