राहुल गांधी, मायावतींचे काय होणार?; भाजपचा प्रश्न

Mayawati, Rahul Gandhi
Mayawati, Rahul Gandhi

नवी दिल्ली : पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या भाजपविरोधी महाआघाडीच्या सर्वोच्च नेत्या बनण्याची धडपड करत आहेत व आता राहुल गांधी, मायावती आदी इच्छुकांचे काय होणार, असा उपरोधिक प्रश्‍न भाजपने विचारला आहे.

न्यायालयीन आदेशानुसार कोलकत्यात चीट फंड गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी गेलेल्या केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) पथकाला पश्‍चिम बंगाल पोलिसांनी ताब्यात घेणे, नंतर मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी धरणे धरणे, "राजदार' पोलिस आयुक्त राजीव कुमार यांना त्यांनी पाठीशी घालणे, या घटनाक्रमावरून भाजपने दिल्लीत रान उठविले. ममता बॅनर्जी यांना आज पाठिंबा देणारे कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी याच चीट फंड गैरव्यवहाराची निंदा करणारे वक्तव्य 2014 मध्ये केले होते, त्याचाही पुरावा भाजपने दिला. 

बंगालवरून संसदेचे कामकाज आज अपेक्षित गोंधळामुळे बंद पडले. इकडे भाजपने बंगालच्या महाभारतावरूनच निवडणूक आयोगाकडे गाऱ्हाणे मांडण्याबरोबरच ममता बॅनर्जी व त्यांना पाठिंबा देणाऱ्या विरोधकांची भूमिका घटनाविरोधी असल्याचा दावा केला. ममता बॅनर्जी यांची घटनाविरोधी कृती त्यांनाच अतिशय महागात जाईल व लोकसभेत भाजपला मोठा लाभ होईल असा सत्तारूढ गोटाचा होरा आहे. बंगालच्या राज्यपालांनी साऱ्या घटनाक्रमाबाबत केंद्राला अहवाल पाठविला असून, त्यावर केंद्रीय गृहमंत्रालय लवकरच निर्णय घेईल असेही सांगितले जाते. 

भाजप नेते रविशंकर प्रसाद म्हणाले, की पोलिस आयुक्त राजीव कुमार यांना सीबीआयने 2017 व 2018 मध्ये तीनदा समन्स बजावले. कायद्यानुसार केंद्रीय तपास संस्थेला हे अधिकार आहेतच. तीनदा समन्स बजावूनही हे पोलिस अधिकारी चौकशीला हजर होत नाहीत व सीबीआय अधिकारी चौकशीसाठी पोहोचताच त्यांनाच पोलिस ताब्यात घेतात, हे सारे घटनेचा आदर करणारे आहे का? याच राजीव कुमार यांना 2016 मध्ये निवडणूक आयोगाने आयुक्तपदावरून हटविले होते. 

आर्थिक गैरव्यवहारातील प्रमुख संशयित असलेले एका राज्याचे सर्वोच्च पोलिस आयुक्त धरणे धरून मुख्यमंत्र्यांशेजारी बसतात, हे किती विचित्र व तेवढेच संशयास्पद दृश्‍य आहे असे सांगून प्रसाद म्हणाले, की ममता बॅनर्जी यांच्यासारख्या नेत्या अरविंद केजरीवाल सारख्यांच्या अराजकतावादी राजकारणाच्या वाटेवर निघाल्या आहेत, हे व्यथित करणारे आहे. शारदा, नारद व चीट फंड गैरव्यवहारांची चौकशी मोदी सरकार सत्तेवर येण्याआधी 26 एप्रिल 2013 मध्ये सुरू झाल्याचेही प्रसाद यांनी नमूद केले. सीबीआयची सध्याची कृती त्याच चौकशीचा भाग आहे. राहुल गांधी यांनी याच चीट फंड गैरव्यवहाराची कडक निंदा करणारे ट्विट केले होते, तेही प्रसाद यांनी वाचून दाखविले. 

अंतस्थ गुपितांमुळे? 
याच शारदा, नारदा व चीट फंड गैरव्यवहारांत मदन मित्रा, तपस पॉल, सुदीप बंडोपाध्याय या नेत्यांची धरपकड झाली तेव्हा ममता इतक्‍या व्याकूळ झाल्या नव्हत्या. मात्र, 1983 च्या आयपीएस बॅचचे राजीव कुमार यांच्याकडे सीबीआय पोचताच त्या इतक्‍या बिथरल्या याचे कारण या "राजदारा'कडे बरीच अंतस्थ गुपिते आहेत असा सूचक संशयही प्रसाद यांनी व्यक्त केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com