राहुल गांधी यांच्यावर भाजपचा हल्लाबोल

वृत्तसंस्था
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

सिटिझन जर्नालिस्ट बनू या
'ई सकाळ'च्या नव्या रचनेत वाचकांच्या मतांना, विचारांना सर्वोच्च प्राधान्य आहे. 
आपण ई सकाळमध्ये सहभागी होऊ शकताः

  • 'सकाळ संवाद'द्वारेः अॅन्ड्रॉईड अॅप डाऊनलोड करा आणि पाठवा बातम्या, लेख, फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ. 
  • ई मेलद्वारेः आपले सविस्तर मत ई मेल करा webeditor@esakal.com आणि Subject मध्ये लिहाः CitizenJournalist
  • प्रतिक्रियांद्वारेः व्यक्त व्हा बातम्यांवर, प्रतिक्रियांवर

नवी दिल्ली : कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या व सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असलेल्या आरोपांचे खंडन करताना भाजपने मोदी "गंगेप्रमाणे पवित्र व निर्मळ' असल्याचे नमूद केले. आपल्या मेहुण्याच्या अफाट भ्रष्टाचाराबाबत एक अक्षरही न बोलणारे व स्वतः एका भ्रष्टाचारात जामिनावर "बाहेर' असलेले राहुल गांधी यांच्याकडून अशा निराधार आरोपांशिवाय देशाला दुसरी अपेक्षाच नाही, असा प्रतिहल्ला केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी चढविला.

राहुल यांच्या आरोपानंतर काही मिनिटांतच भाजप मुख्यालयात येऊन प्रसाद यांनी गांधी यांच्यावर ते भ्रष्टाचाराचे साक्षात संरक्षक असल्याची टीका केली. ते म्हणाले, की ऑगस्टा-वेस्टलॅंड हेलिकॉप्टर करार गैरव्यवहारात गांधी घराण्याचे थेट नाव आले आहे व त्यापासून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी असे लाजिरवाणे आरोप देशाच्या पंतप्रधानांवर केले जात आहेत.

राहुल गांधी यांनी जो कथित आरोप मोदींवर केला ते प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याचे सांगून प्रसाद म्हणाले, की ज्यांच्या सरकारच्या कार्यकाळात भ्रष्टाचाराने कळस गाठला, त्या सरकारने भ्रष्टाचार करताना आकाश, पाताळ, जमीन यांनाही सोडले नाही ते गांधींसारखे नेते मोदींसारख्या स्वच्छ नेत्यांवर आरोप करतात तेव्हा ते हास्यास्पद ठरतात. जनता विविध राज्यांतील निवडणुकांमधून मोदींच्या नोटबंदी निर्णयामागे ठामपणे उभी राहिलेली पाहून कॉंग्रेस नेत्यांची मनस्थिती हताश व निराश झाली आहे. स्वतः गांधी नॅशनल हेराल्ड खटल्यात जामिनावर आहेत. त्यांच्या पक्षाचा तर सारा इतिहासच भ्रष्टाचाराने बरबटलेला आहे. लोक या पक्षाला आता नगरपालिकांसाठीही लायक समजत नाहीत हे नुकतेच दिसून आले आहे.
दरम्यान, नॅशनल हेराल्ड गैरव्यवहारात गांधी मायलेकांना न्यायालयात खेचणारे खासदार सुब्रमण्यम स्वामी म्हणाले, की मोदींवरील आरोपांची संभावना खुद्द न्यायालयाने "बकवास' या शब्दांत केलेली आहे. गृहराज्यमंत्री किरण रिज्जू यांनी तर प्रसाद यांच्यापुढे जाऊन, राहुल यांचे बोलणे गांभीर्याने का घेता? असा सवाल करून स्वपक्षाला घरचा आहेर दिला आहे. कॉंग्रेसवालेही राहुल यांना गंभीरपणे घेत नाहीत, असे ते म्हणाले.

Web Title: bjp slams rahul gandhi