मणिपूरमध्ये भाजपकडून पैसा व शक्तीचा वापर- शर्मिला

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 मार्च 2017

भाजपने सुरवातीला निवडणुकीत पैसा आणि शक्तीचा वापर केला. आता सत्ता स्थापनेतही तेच करण्यात येत आहे. निवडणुकीतील निकालानंतर मी खूप निराश झाले होते.

कोइम्बतूर - मणिपूरमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपकडून पैसा आणि शक्तीचा वापर करण्यात आल्याचा आरोप, सामाजिक कार्यकर्त्या इरोम शर्मिला यांनी केला आहे.

मणिपूरमध्ये भाजप दोन नंबरचा पक्ष ठरला होता. काँग्रेसला सर्वाधिक 28 जागा मिळूनही भाजपने सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. तसेच भाजपने एन. बिरेन सिंह यांची मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून घोषणा केली आहे. यावरून भाजपवर टीका होत असताना, आता इरोम शर्मिला यांनीही भाजपला लक्ष्य केले आहे. इरोम शर्मिला यांना मुख्यमंत्री इबोबी सिंह यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. शर्मिला यांना अवघी 90 मते मिळाली होती. त्यामुळे त्यांनी राजकारण सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

शर्मिला म्हणाल्या, की भाजपने सुरवातीला निवडणुकीत पैसा आणि शक्तीचा वापर केला. आता सत्ता स्थापनेतही तेच करण्यात येत आहे. निवडणुकीतील निकालानंतर मी खूप निराश झाले होते. त्यामुळे केरळमध्ये मी ध्यानधारणेसाठी आले आहे. 

Web Title: BJP used money and muscle power in Manipur, Irom Sharmila says