भाजपला मिळणार नव्या वर्षात नवे अध्यक्ष! 

सकाळ न्यूज नेटवर्क 
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

महाराष्ट्र, हरियाणा व झारखंड या राज्यांच्या विधानसभा निवडणुका मात्र वर्तमान अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याच नेतृत्वाखाली पक्ष लढणार असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. राजधानी दिल्लीच्या निवडणुका पुढील वर्षी फेब्रुवारीत होणार आहेत व त्यावेळी नवे भाजप अध्यक्ष असतील असेही स्पष्ट झाले आहे. 

नवी दिल्ली : सत्तारूढ भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक निवडणुका येत्या डिसेंबरअखेर पूर्ण होणार आहेत. त्यानंतर जानेवारी 2020 मध्ये पक्षाच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षांची निवड किंवा नियुक्ती होणार आहे.

महाराष्ट्र, हरियाणा व झारखंड या राज्यांच्या विधानसभा निवडणुका मात्र वर्तमान अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याच नेतृत्वाखाली पक्ष लढणार असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. राजधानी दिल्लीच्या निवडणुका पुढील वर्षी फेब्रुवारीत होणार आहेत व त्यावेळी नवे भाजप अध्यक्ष असतील असेही स्पष्ट झाले आहे. 

पंतप्रधान नरेद्र मोदी यांचा करिष्मा व शहा यांचे संघटनकौशल्य यांच्या जोरावर भाजपने यंदा सलग दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळविले. इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रांद्वारे झालेल्या या निवडणुकीत भाजपला 542 पैकी 303 जागांसह भरघोस विजय मिळाला. 

भाजपच्या निवडणूक यंत्रणेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक दिल्लीत झाली. राष्ट्रीय निवडणूक मुख्याधिकारी राधामोहन सिंह यांनी बूथ पातळीपासून राज्यस्तरापर्यंतच्या राज्य निवडणूक पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा, संघटनमंत्री बी. एल. संतोष, माजी गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, खासदार विनोद सोनकर शास्त्री व कर्नाटकचे आमदार सी टी रवी उपस्थित होते. भाजपच्या घटनेनुसार राज्य पातळीवरील संघटनात्मक पदाधिकाऱ्यांच्या व प्रदेशाध्यक्षांच्या निवडीनंतर राष्ट्रीय अध्यक्षांची निवड होण्यासाठी किमान एक महिना कालावधी आवश्‍यक असतो. 

10 कोटी पक्षसदस्यांसह जगातील सर्वांत मोठा राजकीय पक्ष असल्याचा भाजप नेतृत्वाचा दावा आहे. चीनच्या कम्युनिस्ट पार्टीची सदस्यसंख्याही काही कोटींच्या घरात आहे. भाजप सदस्यनोंदणी 20 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. त्यानंतर 11 सप्टेंबरपासून पक्षाच्या संघटनात्मक निवडणुकांची प्रक्रिया सुरू होईल. राधामोहनसिंह यांच्या म्हणण्यानुसार 30 सप्टेंबरपर्यंत संघटनात्मक निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर मंडल अध्यक्षांच्या निवडणुका होतील. 30 नोव्हेंबरपर्यंत जिल्हाध्यक्षांच्या व 15 डिसेंबरपर्यंत प्रदेशाध्यक्षांच्या निवडणुका व्हाव्यात असा पक्षनेतृत्वाचा प्रयत्न आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP will appoint new president in new year