कर्नाटकात भाजप सरकार तरले; 15 पैकी 12 जागांवर विजय

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 डिसेंबर 2019

विधानसभेची सध्याची सदस्य संख्या 222 आहे. त्यात आता भाजपचे संख्याबळ 118 झाले आहे. फक्‍त 14 महिन्यात धजद-कॉंग्रेस युती सरकार पाडणाऱ्या 15 अपात्र आमदारांना मतदार धडा शिकवतील, असे धजद व कॉंग्रेसकडून सांगितले जात होते.

बंगळूर - कर्नाटकात झालेल्या 15 विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकीत मतदारांनी सत्ताधारी भाजपला कौल दिला आहे. भाजपचे विधानसभेतील संख्याबळ 118 वर पोहचल्याने पुढील साडेतीन वर्षे राज्यात भाजपचीच सत्ता राहणार यावर शिक्‍कामोर्तब झाले आहे. मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी पोटनिवडणुकीत एकहाती यश मिळविले आहे. येडियुराप्पा यांनी आपला करिष्मा पुन्हा एकदा सिद्ध करताना 15 पैकी 12 अपात्र आमदारांना विधानसभेत पाठवले. या निवडणुकीत कॉंग्रेसला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले. तर एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाले. धजदला खातेही उघडता आलेले नाही. 

विधानसभेची सध्याची सदस्य संख्या 222 आहे. त्यात आता भाजपचे संख्याबळ 118 झाले आहे. फक्‍त 14 महिन्यात धजद-कॉंग्रेस युती सरकार पाडणाऱ्या 15 अपात्र आमदारांना मतदार धडा शिकवतील, असे धजद व कॉंग्रेसकडून सांगितले जात होते. मात्र, मतदारांनी बंडखोर आमदारांना उचलून धरत अपेक्षाभंग केला. शिवाजीनगर आणि हुनसूरमध्ये कॉंग्रेसला अनपेक्षित यश मिळाले आहे. तर 15 पैकी 12 मतदारसंघांत उमेदवार देऊनही धजदला एकही जागा जिंकता आली नाही.

एच. विश्‍वनाथ यांचा पराभव धक्कादायक

शिवाजीनगर मतदारसंघात कॉंग्रेसचे रिझवान अर्षद व हुनसूरमध्ये मंजुनाथ यांनी विजय मिळविला. भाजपकडून लढणारे धजदचे माजी प्रदेशाध्यक्ष एच. विश्‍वनाथ यांचा पराभव धक्कादायक मानला जात आहे. या पोटनिवडणुकीत धजद आणि कॉंग्रेसने स्वतंत्र उमेदवार दिले होते. दोन्ही पक्षांनी भाजपकडून लढणाऱ्या बंडखोर उमेदवारांच्या पराभवाकडे अधिक लक्ष दिले होते. मात्र, त्याचा काही उपयोग झाला नसल्याचे निकालावरुन दिसून येते. गोकाकचे विजयी उमेदवार रमेश जारकीहोळी यांना उपमुख्यमंत्री करणार असल्याचे भाजप नेत्यांनी प्रचारावेळी जाहीरपणे सांगितले होते. त्यामुळे, रमेश यांना उपमुख्यमंत्रीपद मिळणार का, याचीच उत्सुकता आहे. 

मंत्रीपदाची माळ 

अपात्र आमदारांमुळेच भाजप सत्तेवर आली असल्याने पोटनिवडणुकीत जिंकणाऱ्या अपात्र आमदारांना मंत्रीपद देण्याची घोषणा मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी यापूर्वीच केली आहे. निकालानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी याचा पुनरुच्चार केला. आपण दिलेला शब्द पाळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे, 15 पैकी 12 आमदारांनी विजय मिळविल्याने आता त्यांना मंत्रीपद मिळणे निश्‍चित झाले आहे. मात्र, यामुळे भाजपातील अंतर्गत राजकारण तापणार असून पक्षात असंतुष्टांची संख्याही वाढण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

होसकोटेत भाजपला धक्‍का 

होसकोटे मतदारसंघात भाजपचे बंडखोर उमेदवार शरथ बच्चेगौडा यांनी विजय मिळविला आहे. याठिकाणी जातीय समीकरणे लागू पडली. कॉंग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेले अपात्र आमदार एमटीबी नागराजू या मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. त्यामुळे, भाजपचे इच्छूक उमेदवार बच्चेगौडा यांनी पक्षाच्या निर्णयाविरोधात जात अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविली. या मतदारसंघात वक्कलीग आणि कुरबर या समुदायाची मते निर्णायक ठरतात. भाजप आणि कॉंग्रेसचे दोन्ही उमेदवार वक्कलीग समुदायाचे होते. त्यामुळे, समाजाच्या मतांची विभागणी झाली. तर कुरबर समाजाची एकजूट कायम राहिल्याने बच्चेगौडांना विजय आपल्याकडे खेचता आला. 

मतदारसंघनिहाय निकाल असा 

गोकाक 
रमेश जारकीहोळी (भाजप) : 87,450 (विजयी) 
लखन जारकीहोळी (कॉंग्रेस) : 58,444 

कागवाड 
श्रीमंत पाटील (भाजप) : 76,952 (विजयी) 
राजू कागे (कॉंग्रेस) : 58,395 

अथणी 
महेश कुमठळ्ळी (भाजप) : 99,203 (विजयी) 
गजानन मंगसुळी (कॉंग्रेस) : 59,214 

कृष्णराजपेट 
नारायण गौडा (भाजप) : 66,094 (विजयी) 
बी. एल. देवराज (धजद) : 56,363 

चिक्कबळ्ळापूर 
डॉ. सुधाकर (भाजप) : 84,389 (विजयी) 
एम. अंजनप्पा (कॉंग्रेस) : 49,588 

के. आर. पुरम 
बी. ए. बसवराज (भाजप) : 1,39,879 (विजयी) 
एम. नारायणस्वामी (कॉंग्रेस) : 76,436 

राणेबेन्नूर 
अरुणकुमार (भाजप) : 95,438 (विजयी) 
के. बी. कोळीवाड (कॉंग्रेस) : 72,216 

यल्लापूर 
शिवराम हेब्बार (भाजप) : 80,442 (विजयी) 
भिमण्णा नाईक (कॉंग्रेस) : 49, 034 

महालक्ष्मी लेआऊट 
के. गोपालय्या (भाजप) : 85,889 (विजयी) 
एम. शिवराजू (कॉंग्रेस) : 31,503 

यशवंतपूर 
एस. टी. सोमशेखर (भाजप) : 1,44 722 (विजयी) 
टी. एन. जवराई गौडा (धजद) : 1,17,023 

विजयनगर 
आनंद सिंग (भाजप) : 85,477 (विजयी) 
व्ही. वाय. घोरपडे (कॉंग्रेस) : 55352 

हिरेकेरुर 
बी. सी. पाटील (भाजप) : 85,562 (विजयी) 
बसाप्पा बन्नीकोड (कॉंग्रेस) : 56495 

हुनसूर 
एच. पी. मंजुनाथ (कॉंग्रेस) : 92,725 (विजयी) 
एच. विश्‍वनाथ (भाजप) : 52,998 

शिवाजीनगर 
रिझवान अर्शद (कॉंग्रेस) : 49,890 (विजयी) 
एम. सरवना (भाजप) : 36,369 

होसकोटे 
शरथ बच्चेगौडा (अपक्ष) : 81671 (विजयी) 
एमटीबी नागराज (भाजप) : 70,185 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP Wins 12 Karnataka Assembly Seats Out Of 15