भाजपचा सुतावरून स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 21 डिसेंबर 2016

नवी दिल्ली - चंडीगड महापालिकेत तब्बल 20 वर्षांनंतर जोरदार पुनरागमन करून सत्ता मिळविलेल्या भाजपने "जनतेच्या परीक्षेत नोटाबंदी पास झाली' अशी भावना व्यक्त केली आहे. पंजाबसह आगामी पाच राज्यांतील निवडणुकांतही चंडीगडच्या निकालाची पुनरावृती होईल, असा आशावाद भाजपने व्यक्त केला असून, हा सुतावरून स्वर्ग गाठण्याचा प्रकार असल्याचे मत राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत.

नवी दिल्ली - चंडीगड महापालिकेत तब्बल 20 वर्षांनंतर जोरदार पुनरागमन करून सत्ता मिळविलेल्या भाजपने "जनतेच्या परीक्षेत नोटाबंदी पास झाली' अशी भावना व्यक्त केली आहे. पंजाबसह आगामी पाच राज्यांतील निवडणुकांतही चंडीगडच्या निकालाची पुनरावृती होईल, असा आशावाद भाजपने व्यक्त केला असून, हा सुतावरून स्वर्ग गाठण्याचा प्रकार असल्याचे मत राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत.

चंडीगडच्या निवडणुकीत कॉंग्रेसला धूळ चारल्यामुळे भाजपचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. भाजपने 26 पैकी तब्बल 20 जागा जिंकल्या आहेत. या निकालांच्या पार्श्‍वभूमीवर आपकडे वळू पाहणारे भाजपचे माजी खासदार नवज्योतसिंग सिद्धू यांना लवकरात लवकर आपल्या कळपात ओढण्याची घाई कॉंग्रेसने चालवली आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी या विजयाचे वर्णन नोटाबंदीला मिळालेला जनमताचा कौल, असे केले आहे. ते म्हणाले, की नोटाबंदीनंतर जेथे जेथे निवडणुका झाल्या तेथे भाजपला मिळालेला विजय नोटाबंदीला मिळालेला कौलच आहे.

पक्षनेते श्रीकांत शर्मा यांनी सांगितले, की चंडीगडमध्ये आपने निवडणूक लढविली नाही. त्यामुळे भाजपचा विजय सुकर झाला, असे म्हणणे चुकीचे आहे. कॉंग्रेसच्या सात दशकाच्या भ्रष्ट राजवटीला कंटाळलेल्या जनतेने त्या पक्षाला चंडीगडमध्ये पुन्हा जागा दाखवून दिली आहे. मोदी सरकारचा कारभार देशवासीयांनी मान्य केल्याचे हे निदर्शक आहे. पंजाब व उत्तर प्रदेशासह ज्या पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत, तेथेही हाच कल कायम राहील. कॉंग्रेसला लोक आजही नाकारत आहेत हे या पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी लक्षात घ्यावे व मोदींवर निरर्गल विधाने करणे थांबवावे.

दरम्यान, भाजपच्या चंडीगड निकालांच्या विश्‍लेषणाबाबत जाणकारांनी दुमत नोंदवले आहे. ज्येष्ठ विश्‍लेषक फराज हमद यांच्या मते चंडीगड हा मतदारसंघ भारताचे प्रतिनिधित्व करतच नाही; तो इंडियाच्या अल्प भागाचे प्रतीनिधित्व करतो जेथे उच्च मध्यमवर्गीय नावाच्या भाजपच्या पारंपरिक मतपेढीचा भरणा आहे. चंडीगडचा निकाल हे नोटाबंदीला मिळालेली पावती असेल तर महाराष्ट्रातील पालिकांचे ताजे निकाल काय सांगतात. तेथे भाजपची पीछेहाट कशी झाली, याचेही उत्तर भाजपच्या नेतृत्वाने द्यावे. चंडीगडचा कल पाच राज्ये तर सोडाच; पण पंजाबात जरी कायम राहिला तरी खुद्द भाजपसाठी तो मोठा चमत्कार ठरेल, असेही मत अहमद यांनी व्यक्त केले.

Web Title: BJP won Chandigarh