...आणि अडवानी गप्प झाले 

LK Advani
LK Advani

नवी दिल्ली : राफेलवरील चर्चेच्या उत्तरादाखल संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अडीच तासांहून अधिक काळ झालेल्या भाषणानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी प्रश्‍न विचारले. त्यावर संरक्षणमंत्र्यांनी उत्तर देताना "पंतप्रधान व आपला काँग्रेसने अपमान केल्याचा आरोप केला' असा हल्ला चढवला. परंतु राफेलच्या किमतींबद्दल समाधान न झाल्याने पुन्हा राहुल गांधीचा बोलण्याचा प्रयत्न होता. लोकसभाध्यक्षांकडून परवानगी न मिळाल्याने नाराज काँग्रेसच्या खासदारांनी गोंधळ घालण्यास सुरवात केली. या गोंधळामुळे अस्वस्थ झालेल्या लालकृष्ण अडवानी यांनी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र लोकसभाध्यक्षांनी त्यांनाही बोलण्याची मनाई केली. एवढेच नव्हे तर शेजारी असलेल्या कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनीही न बोलण्याबाबत खुणावल्याने अडवानींना गप्पच राहावे लागले.

"राफेल'वर राहुल गांधी यांच्या टीकेमुळे घायाळ झालेल्या भाजपने आज लोकसभेतील चर्चेदरम्यान संरक्षण व्यवहारातील दलालांशी संबंधांवरून कॉंग्रेसवर आरोपांच्या फैरी झाडल्या आणि रॉबर्ट वद्रांवरून कॉंग्रेस नेतृत्वाला लक्ष्य केले. 

राफेलवरील चर्चेच्या पहिल्या भागात राहुल गांधींनी सत्ताधाऱ्यांना घेरले होते. आज भाजपच्या बाकांवरून कॉंग्रेसवर जोरदार आरोप करण्यात आले. चर्चेदरम्यान, खासदार अनुराग ठाकूर यांनी कॉंग्रेसचा नेहमी संरक्षण व्यवहारातून मिळणाऱ्या कमिशनवर डोळा राहिला आहे, असा आरोप केला. राफेल खरेदी हा एकमेव व्यवहार राष्ट्रहिताच्या दृष्टिकोनातून झाला आहे, असाही दावा ठाकूर यांनी केला. 

तर भाजपचे दुसरे खासदार निशिकांत दुबे यांनी, संरक्षण व्यवहारातील दलालांचे कॉंग्रेसच्या नेत्यांशी संबंध असल्याचा हल्ला चढवला. शस्त्रास्त्र दलाल आणि ओआयएस कंपनीचा मालक संजय भंडारीचा, दुबईच्या पिलॅटल कंपनीचा "राष्ट्रीय दामाद' रॉबर्ट वद्रा यांच्याशी काय संबंध आहे, अमेरिकेतील यूबीएस बॅंकेमध्ये असलेल्या गुप्त खात्याचे खातेधारक कोण आहेत, बराक मिसाईल व्यवहारातील सुरेश मुलचंदानी आणि कॉंग्रेसचे खजिनदार (अहमद पटेल) यांचे काय संबंध आहेत याचा खुलासा करण्याचे आव्हान दुबे यांनी दिले. यावर आरएसपीचे एन. के. प्रेमचंद्रन यांनी सत्ताधाऱ्यांना प्रत्युत्तर देताना भाजपच्या सिद्धार्थनाथ सिंह यांचे कोणाशी संबंध आहेत हे सांगा, असा खोचक सवाल केला. 

तत्पूर्वी, कॉंग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातील त्रुटींचा उल्लेख करून सरकारला फटकारले आणि राफेल विमानांची नेमकी किंमत किती आहे? अनिल अंबानींना ऑफसेट कंत्राट कसे मिळाले? याची चौकशी संयुक्त संसदीय समितीमार्फतच होऊ शकते, अशीही मागणी केली. तर लढाऊ विमान खरेदी करार फ्रान्सऐवजी इटलीशी झाला असता तर कॉंग्रेसने आक्षेप घेतला नसता. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांऐवजी राफेलसारख्या निरर्थक विषयांवर कॉंग्रेस पक्ष चर्चा करत आहे, असा टोला अकाली दलाचे प्रेमसिंग चंदूमाजरा यांनी लगावला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com