भाजपचा "पाच साल-पचास काम'चा नारा

वृत्तसंस्था
रविवार, 25 नोव्हेंबर 2018

"पाच साल-पचास काम' या प्रमुख संकल्पनेभोवती फिरणाऱ्या महिला आघाडीच्या या अधिवेशनाला देशाचे पंतप्रधान उपस्थित राहण्याची भाजपच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे.

नवी दिल्ली : सत्तारूढ भाजपच्या महिला आघाडीच्या आगामी राष्ट्रीय अधिवेशनाची संकल्पना "पाच साल-पचास काम' ही असून, निवडणूक वर्षात पन्नास टक्‍क्‍यांपैकी जास्तीत जास्त महिला मतदारांना भाजपकडे वळविण्याचा संदेश यानिमित्ताने पक्षनेतृत्वाकडून दिला जाईल. येत्या 22 व 23 डिसेंबरला कर्णावती किंवा अहमदाबादेत होणाऱ्या अधिवेशनाचा समारोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. पक्षाध्यक्ष अमित शहा त्याचे उद्‌घाटन करणार आहेत. "पाच साल-पचास काम' या प्रमुख संकल्पनेभोवती फिरणाऱ्या महिला आघाडीच्या या अधिवेशनाला देशाचे पंतप्रधान उपस्थित राहण्याची भाजपच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे.

भाजपने 2019 च्या निवडणुकीत महिलावर्गावर विशेष लक्ष केंद्रित करण्याचे ठरविले आहे. देशातील मतदारांच्या निम्म्या मतदार महिलाच आहेत. महिला आघाडीच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी "सकाळ'ला सांगितले की, मोदी सरकारच्या गेल्या पाच वर्षांतील विविध योजनांवर नजर टाकली तर यातील बहुतांश योजनांमध्ये कोठे ना कोठे महिला हा घटक केंद्रस्थानी असल्याचे दिसते. मोदी सरकारच्या जनकल्याण योजनांच्या लाभार्थींमधील तब्बल 18 कोटी या महिलाच आहेत. खास महिलांसाठी या सरकारने केलेल्या निर्णयांची मालिका तर खूपच मोठी आहे. तोंडी तलाकच्या निर्णयाची चर्चा जास्त झालेली आहे. मात्र बालिकांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा, अंगणवाडी-आशा कर्मचाऱ्यांच्या मानधनात दुप्पट वाढ, उज्ज्वला व सौभाग्यसारख्या योजना आदी अनेक निर्णय यामध्ये मोडतात.

महिला आघाडीचे राष्ट्रीय अधिवेशन सुमारे दहा वर्षांनी होत आहे. दोन दिवसांच्या अहमदाबाद अधिवेशनात भाजपच्या महिला ग्रामपंचायत सदस्यांपासून मुख्यमंत्री, महापौर, आमदार, खासदार, राज्ये व केंद्रातील महिला मंत्र्यांपर्यंत पदाधिकारी उपस्थित राहतील. यानिमिताने मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री महिला पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील. अधिवेशनात तीन प्रमुख ठराव मंजूर करण्यात येणार आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJPs new slogan five year fifty Work