ते काळवीट नैसर्गिक मरणानेच मेले: सलमान

वृत्तसंस्था
शुक्रवार, 27 जानेवारी 2017

ते काळवीट नैसर्गिक मरणानेच मेल्याचे स्पष्ट करणारा डॉ. नेपालिया यांनी यांनी तयार केलेला शवविच्छेदनाचा अहवालच खरा आहे. बाकी सर्व गोष्टी खोट्या आहेत

जोधपूर - काळवीटाच्या शिकारीप्रकरणी प्रसिद्ध अभिनेता सलमान खान याचे निवेदन आज (शुक्रवार) येथील न्यायालयामध्ये नोंदविण्यात आले. "ते काळवीट हे नैसर्गिक मरणानेच मेले,' असे सलमान याने न्यायालयास सांगितले.

"ते काळवीट नैसर्गिक मरणानेच मेल्याचे स्पष्ट करणारा डॉ. नेपालिया यांनी यांनी तयार केलेला शवविच्छेदनाचा अहवालच खरा आहे. बाकी सर्व गोष्टी खोट्या आहेत,'' असे सलमान याने सांगितले. सलमान याला यावेळी जोधपूर येथील दंडाधिकाऱ्यांकडून सुमारे 60 प्रश्‍न विचारण्यात आले. या प्रश्‍नांपैकी बहुसंख्य प्रश्‍नांना सलमान याने "गलत' असे उत्तर दिले.

काळवीटाच्या शिकारीप्रकरणी न्यायालयासमोर सादर करण्यात आलेल्या पुराव्याच्या आधारावर हे प्रश्‍न विचारण्यात आले होते.

""तुम्ही काळवीटास गोळी घातल्याचे दोन जणांनी पाहिले आहे,'' असे मुख्य दंडाधिकारी दलपत सिंह यांनी सांगितले. यावरही सलमान याने "गलत' अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. सलमान याच्याशिवाय सैफ अली खान याचेही निवेदन यावेळी नोंदविण्यात आले.

"हम साथ साथ हैं' या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी (1 ऑक्‍टोबर, 1998) सलमान व इतर अभिनेत्यांनी वन्य प्राण्यांची शिकार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याशिवाय, सलमान याच्याविरोधात बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगल्याचा व वापरल्याचा गुन्हाही दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी, गेल्या 18 जानेवारी रोजी दंडाधिकाऱ्यांनी सलमान याला सर्व आरोपांमधून मुक्त केले होते.

Web Title: Blackbuck died of natural causes, says Salman