काळवीट शिकार प्रकरणी सलमान दोषी; इतर निर्दोष

वृत्तसंस्था
गुरुवार, 5 एप्रिल 2018

या प्रकरणी निकाल ऐकण्यासाठी सलमान खान तसेच या प्रकरणातील सहआरोपी सैफअली खान, तब्बू, सोनाली बेंद्रे आणि नीलम हे कलाकारही न्यायालयात उपस्थित होते. सलमान वगळता या पाच जणांना निर्दोष मुक्त करण्यात आले. 

जोधपूर : काळविटाची शिकार केल्याप्रकरणाच्या खटल्यातील मुख्य आरोपी असलेला अभिनेता सलमान खान याला जोधपूर न्यायालयाने आज (गुरुवार) झालेल्या सुनावणीत दोषी ठरविण्यात आले. मात्र, त्याच्याबरोबर सह आरोपी असलेल्या चौघांची निर्दोष निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. सलमान अद्याप शिक्षा सुनाविलेली नसून, तीन वर्षांपेक्षा अधिक शिक्षा झाल्यास त्याला आजच कारागृहात जावे लागणार आहे.

या प्रकरणी निकाल ऐकण्यासाठी सलमान खान तसेच या प्रकरणातील सहआरोपी सैफअली खान, तब्बू, सोनाली बेंद्रे आणि नीलम हे कलाकारही न्यायालयात उपस्थित होते. सलमान वगळता या पाच जणांना निर्दोष मुक्त करण्यात आले. या प्रकरणाची अंतिम सुनावणी 28 मार्चला संपली होती. त्या वेळी मुख्य न्यायदंडाधिकारी देवकुमार खत्री यांनी निकाल राखून ठेवला होता. अखेर आज या प्रकरणाचा निकाल लागला असून, सलमानला दोषी ठरविण्यात आले आहे. सलमान या प्रकरणी सत्र न्यायालयात अपील करण्याची शक्यता आहे. या खटल्याच्या सुनावणीवेली सलमानचे कुटुंबीयही उपस्थित होते.

वीस वर्षांपूर्वी एक व दोन ऑक्‍टोबर 1998 रोजी 'हम साथ साथ हैं' या चित्रपटाच्या चित्रिकरणाच्या वेळी कांकणी गावात दोन काळविटांची शिकार केल्याचा आरोप सलमान खानवर होता. वन्यजीव संरक्षण कायद्याच्या कलम 51 नुसार सलमानवर गुन्हा दखल करण्यात आला होता, तर त्याला शिकारीला प्रवृत्त केल्याचा आरोप अन्य चार कलाकारांवर होता. त्या दिवशी रात्री हे सर्व कलाकार जिप्सी कारमधून फिरत होते. सलमान गाडी चालवत होता. त्या वेळी त्यांना काळविटांचा कळप दिसल्यावर सलमानने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. यात दोन काळविटांचा मृत्यू झाल्याचा दावा सरकारी वकील भवानीसिंग भाटी यांनी न्यायालयासमोर केला होता. त्यांचा हा दावा सलमानचे वकील एच. एम. सारस्वत यांनी फेटाळताना, या खटल्यात अनेक त्रुटी असल्याने सलमानवरील आरोप सिद्ध करण्यास ते अपयशी ठरल्याचे म्हटले होते. पण, न्यायालयाने सलमानला दोषी ठरविले.

Web Title: Blackbuck Poaching Case Salman Khan found guilty by Jodhpur Court