भोपाळ-उज्जैन एक्‍स्प्रेसमध्ये स्फोट; 6 जखमी

वृत्तसंस्था
मंगळवार, 7 मार्च 2017

भोपाळ-उज्जैन एक्‍स्प्रेसमध्ये मध्य प्रदेशमधील शाजापूर जिल्ह्याजवळ झालेल्या स्फोटात सहा जण जखमी झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार डब्यामधील बॅटरींमुळे हा स्फोट झाल्याचे दिसून येत आहे. स्फोटाच्या नेमक्या कारणाचा शोध घेण्यात येत आहे.

भोपाळ - भोपाळ-उज्जैन एक्‍स्प्रेसमध्ये मध्य प्रदेशमधील शाजापूर जिल्ह्याजवळ झालेल्या स्फोटात सहा जण जखमी झाले आहेत.

भोपाळवरून निघालेली 59320 क्रमांकाची एक्‍स्प्रेस भोपाळजवळ जब्दी स्थानकाजवळ असताना स्फोट झाला. सकाळी साडे नऊ ते दहाच्या दरम्यान जनरल डब्यात हा स्फोट झाला, अशी माहिती इंदौर येथील रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी जितेंद्र कुमार यांनी दिली. प्राथमिक माहितीनुसार डब्यामधील बॅटरींमुळे हा स्फोट झाल्याचे दिसून येत आहे. स्फोटाच्या नेमक्या कारणाचा शोध घेण्यात येत आहे.

जखमींना कलापिपल येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्फोट झाल्यानंतर खिडक्‍यांच्या काचा फुटल्या, स्फोटानंतर जनरल डब्यातून धूरही निघत होता. त्यामुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली आणि प्रवाशांचा सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी गोंधळ उडाला. पोलिस निरीक्षक, जिल्हाधिकारी, दहशतवादविरोधी पथक आणि न्यायवैद्यक पथक घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली आहे.

जखमींना आर्थिक मदतीची घोषणा
मध्य प्रदेश सरकारने अपघातातील जखमींना नुकसानभरपाई म्हणून 25 हजार रुपये तर गंभीर जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

Web Title: Blast in Bhopal-Ujjain Express; 6 injured