गोव्यातील ब्ल्यू फ्लॅग मानांकनास उशीर 

अवित बगळे 
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

गोव्यातील मिरामार किनाऱ्याला राज्यातील सर्वात सुंदर व सुरक्षित किनारा हे ब्ल्यू फ्लॅग मानांकन मिळविण्याची प्रक्रीया आणखीन सहा महिने पुढे गेली आहे. सल्लागारांनी शिफारस करूनही समुद्राचे पाणी योग्य की अयोग्य याच्या चाचण्या करणे गेल्या सहा महिनेपूर्वीपासून सुरु करणे आवश्‍यक होते. आता पुढील सहा महिने या चाचण्या कराव्या लागणार आहेत. त्यामुळे मानांकनाचा दावा करणे सहा महिन्यांनी लांबणीवर पडल्यातच जमा आहे. 
 

पणजी- गोव्यातील मिरामार किनाऱ्याला राज्यातील सर्वात सुंदर व सुरक्षित किनारा हे ब्ल्यू फ्लॅग मानांकन मिळविण्याची प्रक्रीया आणखीन सहा महिने पुढे गेली आहे. सल्लागारांनी शिफारस करूनही समुद्राचे पाणी योग्य की अयोग्य याच्या चाचण्या करणे गेल्या सहा महिनेपूर्वीपासून सुरु करणे आवश्‍यक होते. आता पुढील सहा महिने या चाचण्या कराव्या लागणार आहेत. त्यामुळे मानांकनाचा दावा करणे सहा महिन्यांनी लांबणीवर पडल्यातच जमा आहे. 

केंद्रीय वन, पर्यावरण व हवामान बदल मंत्रालयाच्या पुढाकारातून किनारी भागातील राज्यांना असे मानांकन देण्यासाठी किनारे सुचविण्यासाठी सांगण्यात आले होते. प्रथम किनारा निवडीच्या पातळीवर सरकारने मोठा वेळ घेतला. उत्तर व दक्षिण गोव्यातील एका किनाऱ्याची शिफारस सरकारने यासाठी करण्याचे ठरविले होते. मात्र नंतर मिरामारवर सरकारने शिक्कामोर्तब केले. 

ब्ल्यू फ्लॅग मानांकनासाठी तेथील समुद्राचे पाणी अपायकारक नसावे अशी प्रमुख अट आहे. त्यासाठी किमान सहा महिने त्या पाण्याची चाचणी नियमितपणे करून त्याचा अहवाल सल्लागार कंपनीला देणे आवश्‍यक होते. केंद्रीय मंत्रालयाने यासाठी सिस्कॉम या कंपनीला सल्लागार म्हणून नियुक्त केले होते. त्या कंपनीने सहा महिन्यांपूर्वीच अशा चाचण्या करा अशी सूचना केली होती. मात्र अद्याप त्या चाचण्या सुरु न केल्याने या मानांकनासाठी दावा करण्यातील पहिले सहा महिने वाया गेल्यातच जमा झाले आहे. आता या कंपनीने पुन्हा पत्र पाठवून या चाचण्या करा आणि पूर्वी केल्यास असल्यास त्याचे अहवाल सादर करा असे पत्र राज्य सरकारला पाठवले आहे. डिसेंबरपासून अशा चाचण्या करणे सल्लागार कंपनीला अपेक्षित होते. 

हा आहे निकष 
समुद्राच्या पाण्यात प्रती 100 मिलीमागे ईकोलाय बॅक्‍टेरीयांचे प्रमाण 250 पेक्षा कमी आढळल्यास ते पाणी उत्तम, ते प्रमाण पाचशेपर्यंत असल्यास ते पाणी बरे आणि प्रमाण 1 हजारपर्यंत असल्यास ते पाणी साधारण तर प्रमाण 1 हजारपेक्षा जास्त असल्यास ते वाईट अशी वर्गवारी करावी अशी शिफारसही सल्लागार सिस्कॉनने केली आहे. इन्टेस्टीनल एंटरोकोसी या बॅक्‍टेरीयांचे प्रमाण 100 मिलीमध्ये 100 पेक्षा कमी असल्यास ते पाणी उत्तम, 200 पर्यंत असल्यास बरे, 250 पर्यंत असल्यास ते पाणी साधारण तर प्रमाण 250 हून अधिक असेल ते पाणी खराब म्हणावे असे मार्गदर्शक तत्व सल्लागार कंपनीने नमूद केले आहे.

Web Title: Blue flags nomination delayed in Goa