सावध ऐका, पुढील हाका!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

मुंबईतील अंधेरी येथील मनप्रीतसिंग सहानी या १४ वर्षांच्या नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने नुकतीच इमारतीच्या गच्चीवरून उडी मारून आत्महत्या केली. ‘ब्लू व्हेल’ या ऑनलाइन गेमच्या नादात त्याने हे पाऊल उचलल्याची चर्चा असल्याने अवघे समाजमन ढवळून निघाले आहे. अशा प्रकारच्या आभासी दुनियेने तरुणाईला कसे कवेत घेतले आहे, याचे मूर्तिमंत उदाहरण हे उदाहरण आहे. मनप्रीतने ‘ब्लू व्हेल’च्या वेडातूनच आत्महत्या केल्याचे उघड झाल्यास या गेमने घेतलेला तो भारतातील पहिला बळी ठरेल. जगभरात आतापर्यंत २५० हून अधिक जणांनी या गेमच्या वेडात स्वतःचे जीवन संपवले आहे.

मुंबईतील अंधेरी येथील मनप्रीतसिंग सहानी या १४ वर्षांच्या नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने नुकतीच इमारतीच्या गच्चीवरून उडी मारून आत्महत्या केली. ‘ब्लू व्हेल’ या ऑनलाइन गेमच्या नादात त्याने हे पाऊल उचलल्याची चर्चा असल्याने अवघे समाजमन ढवळून निघाले आहे. अशा प्रकारच्या आभासी दुनियेने तरुणाईला कसे कवेत घेतले आहे, याचे मूर्तिमंत उदाहरण हे उदाहरण आहे. मनप्रीतने ‘ब्लू व्हेल’च्या वेडातूनच आत्महत्या केल्याचे उघड झाल्यास या गेमने घेतलेला तो भारतातील पहिला बळी ठरेल. जगभरात आतापर्यंत २५० हून अधिक जणांनी या गेमच्या वेडात स्वतःचे जीवन संपवले आहे. या गेमची निर्मिती झालेल्या रशियातच आतापर्यंत १३० मुलांनी आत्महत्या केली आहे. त्यामुळे आपली मुले इंटरनेटवर नेमके काय करतात, यावर पालकांनी नजर ठेवावी, असे आवाहन तज्ज्ञ करत आहेत.

कसा खेळला जातो गेम?
ब्लू व्हेल हे मासे अनेकदा समुद्रकिनाऱ्यावर येऊन आत्महत्या करतात. त्यावरून या गेमला त्याचे नाव दिले गेले.
हा गेम मोबाईल किंवा लॅपटॉपच्या माध्यमातून खेळला जातो.
या गेमचे ॲडमिन, क्‍युरेटस संबंधित प्लेअर्सचा सुसाइड ग्रुप्सच्या माध्यमातून शोध घेतात. 
ॲडमिन किंवा क्‍युरेटरकडून रिक्वेस्ट आल्यानंतर प्लेअर्सना ५० दिवसांच्या आत आव्हाने (टास्क) पूर्ण करावी लागतात 
सुरवातीला पहाटे चार वाजता हॉरर फिल्म पाहणे, मध्यरात्री झोपेतून उठणे यासारखे सोपे टास्क दिले जातात. त्यानंतर स्वतःला जखमी करून घेणे, अमली पदार्थांचा ओव्हरडोस घेणे, उंच इमारतींच्या कठड्यावर उभे राहणे यासारखे धोकादायक टास्क दिले जातात.
रोजचे टास्क पूर्ण केल्यावर संबंधिताला स्वतःच्या हातावर निशाणी कोरावी लागते. 
गेमची प्रत्येक स्टेज कंप्लिट केल्यावर पुरावा म्हणून ॲडमीनला छायाचित्र किंवा व्हिडिओ पाठवावा लागतो. 
५० व्या दिवशी सर्व टास्क पूर्ण झाल्यावर या निशाणीचा आकार व्हेल माशासारखा होतो.
सर्व टास्क पूर्ण केल्यावर आत्महत्या करणाऱ्यास विजेता घोषित करण्यात येते. आत्महत्या करण्यासाठी विविध पर्यायही सुचवले जातात.

पालकांनो, जागते रहो!
इंटरनेटचे वेड असणाऱ्यांना विशेषतः किशोरवयीन मुलांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या या गेमने जगभरात खळबळ उडवली आहे. या गेमच्या नादात मुलांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस येत असल्याने रशिया, अमेरिका तसेच युरोपमधील पोलिसांनी या गेमबाबत इशारा दिला आहे. पालकांनी आपले पाल्य इंटरनेटवर नेमके काय करतात, यावर नजर ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. याबाबत सोशल नेटवर्किंग साइट्‌सच्या माध्यमातूनही जागृती करण्यात येत आहे. मनप्रीतने आत्महत्या केल्याचे उघडकीस आल्यानंतर, अशा प्रकारचे ऑनलाइन चॅलेंज देणारे गेम्सचे ‘ॲक्‍सेस’ देणारे मोबाईल फोन किंवा अन्य उपकरणे मुलांच्या ताब्यात देताना पालकांनी सावधगिरी बाळगावी, अशा आशयाचे व्हॉट्‌सॲप मेसेजही सर्वत्र फिरत आहेत.

टास्क पूर्ण न केल्यास धमकावणी
प्लेअर्सना गाणी ऐकणे, हॉरर फिल्म पाहणे, मध्यरात्री झोपेतून उठणे, त्वचेवर ब्लेडने व्हेल माशाची आकृती बनवणे आदी धोकादायक टास्क दिले जातात. पहिला टास्क पहाटे ४.२९ वा. सुरू होतो. प्लेअरने स्वतःला जखमी करून घेण्यासाठी जाणूनबुजून एकापेक्षा एक धोकादायक टास्क दिले जातात. एखाद्या प्लेअरने टास्क पूर्ण करण्यास नकार दिल्यास, त्याची गोपनीय माहिती उघड करण्याची, प्रसंगी कुटुंबीयांना मारण्याची धमकी दिली जाते. त्यामुळे या गेमच्या जाळ्यात ओढल्या गेलेल्या व्यक्तीला मागे फिरणे अनेकदा शक्‍य होत नाही.

भारतासाठी धोक्‍याची घंटा
भारतातही या गेमने हातपाय पसरण्यास सुरवात केली आहे. अनेक पालक नोकरीनिमित्त घराबाहेर असतात. त्यामुळे घरात एकटी असणारी मुले इंटरनेटवर काय करतात, यावर त्यांना नजर ठेवता येत नाही. भारतातील किती मुले हा गेम खेळण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या इंटरनेट ग्रुप्सच्या संपर्कात आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पोलिसांनी गुगल प्ले स्टोअरला म्हणजेच गुगलला या संदर्भात पक्षकार बनवावे. कारण त्यांनी अशा प्रकारच्या गेम्सना ॲप स्टोअरवर समाविष्ट केले आहे. शाळांनीही आपल्या विद्यार्थ्यांकडे लक्ष दिले पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये काही असुरक्षितता किंवा मानसिक ताण-तणाव असेल असे त्यांच्या लक्षात आल्यावर पालकांच्या कानावर घातले पाहिजे. अशा प्रकारच्या गेम्सवर लक्ष ठेवणारी, त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारी एक यंत्रणा असावी.
- प्रशांत माळी, सायबर कायदा व सुरक्षा तज्ज्ञ

तुमचा पाल्य इंटरनेट ॲडिक्‍ट आहे?
इंटरनेट गेमचे व्यसन लागलेली मुले अशा धोकादायक खेळांकडे सहज आकर्षित होतात, असे मानसोपचारतज्ज्ञांचे म्हणणे आहे. इंटरनेट गेम खेळायला मनाई केल्यास या मुलांच्या वर्तनात बदल होतो. ते चिडचिडे, उदासीन प्रसंगी आक्रमकही होतात. ते एकटे राहण्यास प्राधान्य देतात. अनेकदा अभ्यासातही मागे पडतात. त्यांच्या खाण्याचे- झोपेचे प्रमाण कमी होते. त्यांच्या विचार करण्याच्या शक्तीवरही परिणाम होतो. आपल्या मुलांमध्ये अशी लक्षणे दिसल्यास पालकांनी तातडीने डॉक्‍टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन मानसोपचारतज्ज्ञ करत आहेत.

  ‘त्या’ व्यक्ती जैविक कचरा! 
रशियातील फिलिप बुदेइकिन या २५ वर्षांच्या युवकाने २०१३मध्ये या गेमची निर्मिती रशियात केली. या गेममुळे यूझरने आत्महत्या केल्याची पहिली घटना २०१५ मध्ये उघडकीस आली. फिलिपला या वर्षी मे महिन्यात अटक करण्यात आली. किमान १६ किशोरवयीन मुलींना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होता. ‘आत्महत्या करणाऱ्या व्यक्ती जैविक कचरा (बायोलॉजिकल वेस्ट) असतात. समाजाची ‘स्वच्छता’ करण्यासाठी मी या गेमची निर्मिती केली, असे त्याने पोलिसांना सांगितले.

अन्य काही धोकादायक गेम
चोकिंग गेम
हफिंग/डस्टिंग
कार ‘सर्फिंग’
मम्ब्लेटी पेग
द एबीसी
स्क्रॅचिंग गेम

Web Title: Blue whale game children social media