'कॅफे कॉफी डे'चे मालक सिद्धार्थ यांचा मृतदेह सापडला

Siddhartha
Siddhartha

बंगळूर : सोमवारपासून बेपत्ता असलेले 'कॅफे कॉफी डे'चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक व्ही. जी. सिद्धार्थ यांचा आज (बुधवार) सकाळी अखेर मृतदेह सापडला. त्यांनी आत्महत्या केल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती.

अखेर आज सकाळी मंगळूरजवळील होईजे बजारयेथे नेत्रावती नदीच्या पात्रात त्यांचा मृतदेह आढळून आला. सोमवारी सायंकाळपासून संशयास्पदरीत्या बेपत्ता झाल्याने उद्योग वर्तुळात खळबळ निर्माण झाली होती. सिद्धार्थ यांना शोधण्यासाठी आम्ही प्रशासकीय यंत्रणेची मदत घेत आहोत, असे 'कॉफी डे एंटरप्रायजेस'ने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले होते. अखेर आज सकाळी त्यांचा मृतदेह मिळाला आहे. 

दरम्यान, सिद्धार्थ हे बेपत्ता असल्याचे वृत्त पसरताच याचे रोखे बाजारातही पडसाद उमटले होते. 'कॉफी डे'चे समभागही वीस टक्‍क्‍यांनी कोसळले, ही रोखे कोसळण्याची नीचांकी पातळी असल्याने कंपनीला रोखे बाजारातील व्यवहारदेखील थांबवावा लागला. सिद्धार्थ हे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांचे जावई होते, ते सोमवारी त्यांच्या गाडीतून साकलेशपूरच्या दिशेने चालले होते, पण ऐनवेळी त्यांनी त्यांच्या चालकास गाडी मंगळूरच्या दिशेने वळविण्याची सूचना केली. ही गाडी दक्षिण कन्नड जिल्ह्यातील नेत्रावती नदीच्या पुलावर पोचल्यानंतर सिद्धार्थ हे गाडीतून उतरले आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्या चालकास आपण फिरायला जात असून तू येथेच वाट बघत थांब अशी सूचना केली. पण दोन तास उलटून गेल्यानंतरही सिद्धार्थ हे परतले नाही, त्यामुळे त्यांच्या चालकाने थेट पोलिसांशी संपर्क साधून ते बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली होती. तेव्हापासून त्यांचा शोध सुरु होता.

नेत्रावती नदीमध्ये त्यांचा शोध घेण्यासाठी दोनशे पोलिस कर्मचारी आणि 25 बोटी तैनात करण्यात आल्या होत्या. यासाठी श्‍वान पथकाचीही मदत घेतली जात होती. सिद्धार्थ यांनी शेवटच्या क्षणी नेमका कोणाशी संपर्क साधला याचाही शोध घेतला होता. पण, अखेर आज त्यांचा मृतदेह सापडला आहे.

मला माफ करा 
सिद्धार्थ यांनी बेपत्ता होण्यापूर्वी "कॅफे कॉफी डे'च्या कर्मचाऱ्यांना उद्देशून एक पत्र लिहिले असून, यामध्ये त्यांनी त्यांचा आर्थिक संघर्ष आणि फसलेल्या बिझिनेस मॉडलबद्दल स्पष्टपणे लिहिले आहे. यात त्यांनी म्हटले होते की, "माझ्यावर विश्‍वास ठेवणाऱ्या लोकांना ऐनवेळी सोडून जाताना मला आत्यंतिक दु:ख होते आहे. उद्योजक म्हणून मी अपयशी ठरलो आहे, मागील अनेक दिवसांपासून मी संघर्ष केला, पण आता आणखी तणाव सहन करू शकत नाही. रोख्यांसंदर्भात इक्विटी पार्टनर्सकडून येणारा दबाव आणि मित्रांकडून मी मोठी रक्कम उसनवारी घेतल्याने मला तणावास सामोरे जावे लागत होते. ज्यांच्याकडून मी पैसे घेतले त्यांचाही मोठा दबाव माझ्यावर होता. एवढी मेहनत घेतल्यानंतरही मला यशस्वी बिझिनेस मॉडेल तयार करता आले नाही. पण यात कुणालाही फसवण्याची माझी इच्छा नव्हती.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com