Video : गुजरात दंगलीत व्हायरल झालेले 'ते' दोघे आता काय करतात?

संतोष शाळिग्राम
रविवार, 8 सप्टेंबर 2019

गुजरात दंगलीवेळी दोन छायाचित्रांनी जगाला सुन्न केलं होतं. एक होतं उन्मत्त दंगलखोराचं आणि एक होतं भयग्रस्त दंगलपीडिताचं... पण, सतरा वर्षांनी हे दोन्ही चेहरे एकत्र आले आणि त्यांनी हिंदू-मुस्लिम ऐक्‍य दृढ केलं. 

अहमदाबाद - गुजरात दंगलीवेळी दोन छायाचित्रांनी जगाला सुन्न केलं होतं. एक होतं उन्मत्त दंगलखोराचं आणि एक होतं भयग्रस्त दंगलपीडिताचं... पण, सतरा वर्षांनी हे दोन्ही चेहरे एकत्र आले आणि त्यांनी हिंदू-मुस्लिम ऐक्‍य दृढ केलं. 

गुजरातच्या अनेक भागांत फेब्रुवारी २००२ मध्ये जातीय दंगली झाल्या. त्यात अहमदाबाद हे शहर धुमसत राहिलं. त्या वेळी या शहरातून दोन छायाचित्रं जगभर गेली. त्यातील एक अशोक परमार याचं होतं आणि एक कुतुबुद्दीन अन्सारीचं. अशोक हा डोक्‍याला भगवी पट्टी बांधलेला, हातात लोखंडी सळी घेऊन आक्रमकपणे निघालेला दिसला; तर कुतुबुद्दीन भयभीत होऊन जिवाच्या आकांतानं हात जोडून मदतीची याचना करीत असल्याचं त्याच्या छायाचित्रानं दाखवलं होतं. आता या दंगलीला सतरा वर्षं झाली आहेत. दंगलीच्या खाणाखुणा अहमदाबादेतून दिसेनाशा झाल्या आहेत. त्यातच अशोक आणि कुतुबुद्दीन यांनी हिंदू-मुस्लिम ऐक्‍याची प्रचिती पुन्हा एकदा दिली. परिस्थितीनं गरीब असलेला अशोक हा गेली अनेक वर्षं दिल्ली दरवाजा परिसरात पदपथावर बसून चपला दुरुस्तीचे काम करीत होता. आता याच परिसरात त्यानं फुटवेअरचं दुकान थाटलं आहे. त्यानं आग्रहानं या दुकानाचं उद्धाटन कुतुबुद्दीन याच्या हस्तं करवून घेतलं. शुक्रवारी दोघांच्याही मित्रपरिवाराच्या उपस्थितीत हे उद्घाटन करण्यात आलं. कुतुबुद्दीन यानं पहिला ग्राहक बनून त्याच्या दुकानातून एक चप्पल खरेदी करून अशोकच्या व्यवसायाची सुरवात केली. 

ahmedabad

अशोक हा आता ४५, तर कुतुबुद्दीन ४६ वयाचा आहे. कुतुबुद्दीनचा बिरजूनगर भागात टेलरिंगचा व्यवसाय आहे. तो दंगलग्रस्त या वेदनेनं, तर अशोक दंगलपश्‍चात कायदेशीर झळांनी होरपळला होता. त्या वेळची दंगल ही आयुष्यातील वाईट घटना होती. पण, त्याला उत्तर दोन्ही धर्मांतील ऐक्‍य हेच आहे, असं दोघंही मानतात. म्हणूनच, अशोकनं त्याच्या दुकानाला ‘एकता’ असं नाव दिलं आहे.

अशोक म्हणतो, ‘सतरा वर्षं घडलेली घटना हे दु:स्वप्न होतं. त्या वेळी अनाहूतपणे कुणी हा फोटो काढला आणि मला कट्टर हिंदुत्ववादी म्हणून प्रत्येक वेळी दाखवलं गेलं. माझी ही प्रतिमा चुकीची  रंगवली गेली होती. पण, हिंदू-मुस्लिम एकता हेच या देशातील  वास्तव आहे, ते आपण सर्वांनी स्वीकारलं पाहिजे.’

दंगलीवेळी माझी ओळख कट्टरपंथी झाली होती. ती बदलण्यासाठी दंगलग्रस्त आणि मुस्लिम असलेल्या कुतुबभाईच्या हस्ते दुकानाचं उद्घाटन केलं आहे. यातून समाजात एक चांगला संदेश जाईल, अशी भावना अशोक यानं व्यक्त केली.

संबंधित बातम्या :
Video : गुजरात दंगलीतील ‘हिंदू ऑयकॉन’ सध्या काय करतोय?
Video : गुजरात दंगलीमधील ‘तो’ भेदरलेला चेहरा, आज करतोय टेलर काम

   
एकता आणि मानवता हीच भारताची ओळख आहे. सर्व धर्म सलोख्याने राहिले, तर कुणीच आपल्याला एकमेकांविरोधात लढवू शकणार नाही. 
- अशोक परमार

हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई यांच्यातील बंधुत्व हा भारताचा पाया आहे. पण, आम्ही दोघे वेगवेगळ्या दिशेने जात होतो. ‘मालिक’ने आम्हाला एकत्र आणले, याचा आनंद आहे.
- कुतुबुद्दीन अन्सारी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Both faces seventeen years together and they did fast Hindu-Muslim unity