'ब्राह्मोस'ची आता पाणबुड्यांसाठी निर्मिती

आदित्य वाघमारे
शनिवार, 14 एप्रिल 2018

"डीआरडीओ' संस्था हाती घेणार प्रकल्प

चेन्नई : "सुखोई एमकेआय'वर स्वार होऊन लढाऊ विमानांचे बळ वाढवणारी "ब्राह्मोस' क्षेपणास्त्रे आता पाणबुड्यांसाठी तयार केली जाणार आहेत. वजनाला हलकी; पण सारखीच मारकक्षमता असलेली नवी क्षेपणास्त्रे "संरक्षण संशोधन आणि विकास संस्था' (डीआरडीओ) तयार करणार आहे.

"डीआरडीओ' संस्था हाती घेणार प्रकल्प

चेन्नई : "सुखोई एमकेआय'वर स्वार होऊन लढाऊ विमानांचे बळ वाढवणारी "ब्राह्मोस' क्षेपणास्त्रे आता पाणबुड्यांसाठी तयार केली जाणार आहेत. वजनाला हलकी; पण सारखीच मारकक्षमता असलेली नवी क्षेपणास्त्रे "संरक्षण संशोधन आणि विकास संस्था' (डीआरडीओ) तयार करणार आहे.

रशिया आणि भारताच्या संयुक्त संशोधनातून तयार झालेली स्वनातीत "ब्राह्मोस' क्रूझ क्षेपणास्त्र सध्या जमिनीवरून हवेत, युद्धनौकेवरून हवेत, जमिनीवरून जमिनीवर आणि हवेतून हवेत लक्ष्य भेदू शकते. आता या क्षेपणास्त्राचे पाण्यातील नवे रूप तयार करण्यासाठी "डीआरडीओ'ने काम सुरू केले आहे. या वर्षीच्या नव्या प्रकल्पांमध्ये "ब्राह्मोस'च्या वजनाने हलके रूप तयार करण्याच्या कामाचा समावेश करण्यात आला आहे. वेग आणि लक्ष्य भेदण्याच्या क्षमतांना धक्का न लावता आता पाणबुडीतील टोरपॅडो ट्यूबमधून मारा करता येण्यासाठी नव्याने हे क्षेपणास्त्र तयार केले जाणार आहे. आता पाणबुडीमधून मारा अधिक भेदक करण्यासाठी तयार होणारे "ब्राह्मोस' भारतीय नौदलाचे हिंदी महासागरातील बळ वाढवणारा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. या क्षेपणास्त्राचे वजन कमी असले तरी त्याचा वेग आणि लक्ष्य भेदण्याची क्षमता कायम राहणार असल्याची माहिती "ब्राह्मोस' प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक सुधीर मिश्रा यांनी दिली. आगामी पाच वर्षांत या क्षेपणास्त्राचा वेग सहा हजार किलोमीटर प्रतितास नेण्याचा "डीआरडीओ'चा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले.

अन्य लढाऊ विमानांसाठी प्रयोग
गेल्या वर्षी देशाचे प्रमुख लढाऊ विमान असलेल्या "सुखोई-एमकेआय' या विमानासह "ब्राह्मोस'ची चाचणी करण्यात आली होती. ती यशस्वी झाल्याने भारतीय हवाई दलाच्या क्षमतांना नवी उंची प्राप्त झाली होती. वजन कमी करून अन्य विमानांसाठी त्यांच्या क्षमतेनुसार या क्षेपणास्त्राची निर्मिती केली जाणार आहे. त्यामुळे सध्या केवळ "सुखोई-एमकेआय'ला फिट्ट बसणारी सध्याची "ब्राह्मोस' क्षेपणास्त्रे भविष्यात अन्य विमानांवरही स्वार झालेली दिसू शकणार आहेत.

Web Title: Brahmos is now ready for the submarine