ब्रजेश ठाकूरला आजन्म कारावास

पीटीआय
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

अन्य दोषींनाही शिक्षा
जिल्हा बाल संरक्षण अधिकारी वर्मा, बालकल्याण समितीचा सदस्य विकास, गुड्डू पटेल, किशन कुमार आणि रामानूज ठाकूर यांना पॉक्सोअंतर्गत मुलांचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आले असून गुन्हेगारी कट आखणे, बलात्कार, सामूहिक बलात्कार आणि बलात्कारासाठी इतरांना चिथावणी देणे आदीप्रकरणी त्यांना दोषी ठरविण्यात आले आहे. अन्य आरोपी रामा शंकर सिंह आणि अश्‍वनी या दोघांवर गुन्हेगारी कट आखणे आणि बलात्कारासाठी चिथावणी देणे असे ठपके ठेवण्यात आले आहेत. याचप्रकरणातील महिला आरोपी शाहिस्ता परवीन, इंदू कुमारी, मिनू देवी, मंजू देवी, नेहा कुमारी, हेमा मसीह, किरण कुमारी यांच्यावरही गुन्हेगारी स्वरूपाचा कट आखणे, बलात्कारासाठी चिथावणी देणे, मुलांसोबतचे क्रौर्य तसेच आयोगास या प्रकरणाची माहिती न देणे आदीप्रकरणी दोषी ठरविण्यात आले आहे. दरम्यान, मुझफ्फरपूरमधील हे लैंगिक शोषणाचे प्रकरण उघड झाल्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये खळबळ निर्माण झाली होती. बिहारच्या तत्कालीन समाजकल्याणमंत्री मंजू वर्मा यांचे पती आणि ब्रजेश ठाकूर यांचे संबंध उघड झाल्यानंतर वर्मा यांना राजीनामा द्यावा लागला होता.

नवी दिल्ली - देशभर खळबळ माजविणाऱ्या बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यातील निवारागृहातील मुलींच्या लैंगिक छळप्रकरणी दिल्लीतील न्यायालयाने या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार ब्रजेश ठाकूर याला आज आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अतिरिक्त सत्र न्यायाधीश सौरभ कुलश्रेष्ठ यांनी हे आदेश देताना अन्य अकरा जणांनाही जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. तत्पूर्वी, २० जानेवारी रोजीच न्यायालयाने ठाकूरला याप्रकरणी दोषी ठरविले होते.

मुझफ्फरपूर येथील निवारागृहातील मुलींच्या लैंगिक शोषणाचा प्रकार उघड झाल्यानंतर देशभर खळबळ निर्माण झाली होती, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार ब्रजेश ठाकूरने बड्या नेत्यांनाही या मुलींचे लैंगिक शोषण करण्यास भाग पाडल्याचे उघड झाले होते. कधीकाळी याच ठाकूरने बिहार पीपल्स पार्टीच्या (बीबीपी) तिकिटावर निवडणूकदेखील लढविली होती. बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम सहाअंतर्गत मुलांचा लैंगिक छळ करत त्यांचे शोषण करणे, भारतीय दंडविधान संहितेअंतर्गत बलात्कार आणि सामूहिक बलात्कारप्रकरणीही ठाकूरविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते.

सीबीआयची मागणी
न्यायालयाने दिलेल्या १ हजार ५४६ पानांच्या निकालपत्रामध्ये ठाकूर याला विविध कलमांखाली दोषी ठरविण्यात आले असून यामध्ये गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचणे, धारदार शस्त्रांनी हल्ला करत जखमी करणे, स्वत:हून हल्ला करणे आदी ठपके त्याच्यावर ठेवण्यात आले आहेत. तत्पूर्वी सीबीआयने ४ फेब्रुवारी रोजी ठाकूरसाठी आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली जावी, अशी मागणी केली होती. बलात्कार हा बळ आणि वासनेचा गुन्हा असून दोषीला कुठल्याहीप्रकारची दया माया दाखविता कामा नये; कारण याप्रकरणातील पीडित हे अल्पवयीन असल्याचे सीबीआयने म्हटले होते. याप्रकरणातील अन्य पाच दोषी ब्रजेश ठाकूर, दिलीपकुमार वर्मा, रवी रोशन, विकास कुमार, विजय कुमार तिवारी यांनी या प्रकरणामध्ये मुलींचा लैंगिक छळ करत त्यांच्यावर बलात्कार देखील केला, त्यांचे हे कृत्य अत्यंत घृणास्पद असल्याने त्यांना कायम लक्षात राहील अशी आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली जावी, अशी मागणी सरकारी वकील अमित जिंदाल यांनी न्यायालयामध्ये केली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Brajesh Thakur faces imprisonment