आयएएस गोपीनाथन यांना गृहमंत्रालयाने बजावली होती शिस्तभंगाची नोटीस

वृत्तसंस्था
Sunday, 25 August 2019

व्यवस्थेवर टीका करत सनदी सेवेचा त्याग करणारे दमन दीवू आणि दादरा नगर हवेलीचे आयएएस अधिकारी कन्नन गोपीनाथन यांच्याविषयी आणखी एक आश्‍चर्यजनक माहिती समोर आली आहे.

नवी दिल्ली : व्यवस्थेवर टीका करत सनदी सेवेचा त्याग करणारे दमन दीवू आणि दादरा नगर हवेलीचे आयएएस अधिकारी कन्नन गोपीनाथन यांच्याविषयी आणखी एक आश्‍चर्यजनक माहिती समोर आली आहे. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी गृहमंत्रालयाने त्यांना शिस्तभंगाची नोटीस बजावली होती. 

कायमस्वरूपी निवास प्रमाणपत्रांसंदर्भातील योजनेच्या दुरूस्तीसाठी काही कागदपत्रे सादर करण्यात त्यांनी गोपीनाथन यांनी नऊ महिन्यांचा विलंब लावल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. रस्त्यांच्या सुशोभीकरणाच्या प्रकल्पामध्येही हलगर्जीपणा केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला असून या प्रकल्पासाठीचे इलेक्‍ट्रिक पोल हटविण्याचे काम करण्यासही त्यांनी वर्षभराचा विलंब लावल्याची बाब गृहमंत्रालयाच्या निदर्शनास आली होती.

केरळमध्ये गंभीर पूरस्थिती निर्माण झाली असताना त्यांनी या भागाला भेट देत तेथे काही अधिकाऱ्यांच्या बैठकाही घेतल्या होत्या पण त्या दौऱ्याचा अहवाल मात्र त्यांनी केंद्र सरकारला सादर केला नव्हता. विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना पंतप्रधान कार्यालयाकडून विशेष पुरस्कार दिले जातात, यासाठीची नामांकने सादर करण्याचे आदेश त्यांना देण्यात आले होते पण या आदेशाचेही त्यांनी पालन केले नसल्याचे त्यांना बजावण्यात आलेल्या कारणे दाखवा नोटिशीत नमूद करण्यात आले आहे. 

अशीही नोटीस 

गृहमंत्रालयाचे उपसचिव राकेशकुमार सिंह यांनी गोपीनाथन यांना ही नोटीस बजावत दहा दिवसांच्या आत त्यांना आपले म्हणणे मांडण्याचे निर्देश दिले होते तसेच आपल्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई का केली जाऊ नये असा सवालही त्यांनी केला होता. गोपीनाथ यांना 8 जुलै 2019 रोजीच हे नोटीस बजावण्यात आली होती. या नोटिशीलाही त्यांनी 31 जुलै रोजीच उत्तर दिल्याचे सूत्रांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: breach of discipline Notice was issued to IAS officer Kannan Gopinathan