वन अधिकाऱ्याला लाच देण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जानेवारी 2017

दोन्ही आरोपी नादिअदमध्ये राहत होते. त्यांचे गोध्रा येथे गोदाम असून, तेथे ते डिंकाच्या झाडावर प्रक्रिया करून डिंक काढून तो महाराष्ट्राच्या औरंगाबादमध्ये वैद्यकीय कारणासाठी विकत होते. वास्तविक डिंकांच्या आयात आणि निर्यातीसाठी सरकारची परवानगी घ्यावी लागते ...

अहमादाबाद - अटक वाचविण्यासाठी वन अधिकाऱ्याला लाच देण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन व्यावसायिकांना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. या प्रकरणी वन अधिकारी निरुपम वैष्णव याने तक्रार दिली होती. मालुकचंद अगरवाल आणि त्यांचा मुलगा कीर्ती अगरवाल अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या दोघांनी आपल्यावर गुन्हे दाखल न करण्यासाठी वन अधिकाऱ्याला चार लाख रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न केला होता.

दोन्ही आरोपी नादिअदमध्ये राहत होते. त्यांचे गोध्रा येथे गोदाम असून, तेथे ते डिंकाच्या झाडावर प्रक्रिया करून डिंक काढून तो महाराष्ट्राच्या औरंगाबादमध्ये वैद्यकीय कारणासाठी विकत होते. वास्तविक डिंकांच्या आयात आणि निर्यातीसाठी सरकारची परवानगी घ्यावी लागते आणि त्यांनी ती घेतली नव्हती, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सहायक संचालक पी. गेहलोत यांनी सांगितले.

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये वन अधिकारी वैष्णव यांना हे दोघे सरकारच्या परवानगीशिवाय डिंक विकत आहेत याची माहिती मिळाली होती. त्यामुळे त्यांनी अगरवाल यांच्या गोदामावर छापा टाकला. या छाप्याच्या दरम्यान आरोपींनी सरकारच्या परवानगीशिवाय एक हजार 108 कोटी रुपयांचे डिंक विकल्याचे स्पष्ट झाले. त्याची बाजारात दोन कोटी 13 लाख रुपये किंमत होत असल्याचे स्पष्ट झाले. या चौकशीदरम्यान दोन्ही आरोपींनी वैष्णव आणि अन्य अधिकाऱ्यांबरोबर हे प्रकरण मिटविण्यासाठी चार लाख रुपयांची लाच देण्याची तयारी दाखविली होती.
ज्या वेळी आरोपी लाच देण्यासाठी वैष्णव यांना भेटले, तेव्हा वैष्णव यांनी त्याचे सर्व ऑडिओ रेकॉर्डिंग केले आणि त्यानंतर ते लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे गेले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मालुकचंद यांना दोन लाख रुपयांची लाच देताना रंगेहाथ पकडले.

Web Title: Bribe to Forest Officers,two arrested