राम मंदिरासाठी अयोध्येत राजस्थानमधून विटा

वृत्तसंस्था
गुरुवार, 6 जुलै 2017

'रामभक्तांकडून राम मंदिरासाठी देणगी रोख रकमेच्या स्वरूपात न स्वीकारता विटाच द्याव्या' असे आवाहन राम जन्मभूमी न्यासाने जून 2015 मध्ये झालेल्या बैठकीत केले होते

अयोध्या : राम मंदिराच्या प्रस्तावित बांधकामासाठी राजस्थानमधून विटांचे तीन ट्रक काल (बुधवार) अयोध्येमध्ये दाखल झाले. 'राम मंदिरासाठी रोख रक्कम देण्याऐवजी बांधकामासाठी विटा पाठवाव्यात,' असे आवाहन राम जन्मभूमी न्यासाने 2015 मध्ये केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून विश्‍व हिंदू परिषदेने (विहिंप) हे ट्रक पाठविले आहेत.

गेल्या आठवड्यातही दोन ट्रक अयोध्येत दाखल झाले होते. या सर्व ट्रकमधून आलेल्या विटा राम जन्मभूमी न्यासाच्या 'रामसेवकपूरम'मध्ये ठेवण्यात आल्या आहेत. राम मंदिरासाठी दगडांपासून विटा करण्याचे काम रामसेवकपूरममध्ये 1990 पासून सुरू आहे.

'उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाचे सरकार असताना त्यांनी या ट्रकना परवानगी नाकारली होती. यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या 'जैसे थे' आदेशाकडे बोट दाखविले होते', असे विहिंपचे प्रवक्ते शरद शर्मा यांनी सांगितले. 'यंदाच्या जूनपासून राज्य सरकारने 'फॉर्म 19' देण्यास सुरवात केली. यामुळे अन्य राज्यांमधून दगड आणण्याची परवानगी मिळाली. राज्यातील नवे सरकार राम, गाय आणि देशासाठी समर्पित असल्याने हे घडू शकले', असेही शर्मा म्हणाले.

'रामभक्तांकडून राम मंदिरासाठी देणगी रोख रकमेच्या स्वरूपात न स्वीकारता विटाच द्याव्या' असे आवाहन राम जन्मभूमी न्यासाने जून 2015 मध्ये झालेल्या बैठकीत केले होते.

Web Title: Bricks arrive from Rajasthan for Ram Mandir