‘बीएस-६’ इंजिनचा प्रदूषणाला लगाम!

 गोरक्षनाथ ठाकरे
गुरुवार, 21 नोव्हेंबर 2019

देशातील वाहन उद्योगात मोठे बदल होऊ घातले आहेत; मात्र अद्यापही बरेच लोक ‘बीएस-६’ वाहनांविषयी अनभिज्ञ असल्याचे पाहायला मिळते. 

१   एप्रिल २०२० पासून देशभरात केवळ प्रदूषणाला लगाम घालणारी ‘बीएस-६’ अर्थात भारत स्टेज-६ निकषांची पूर्तता करणारी नवी वाहनेच रस्त्यावर येणार आहेत. याचा अर्थ सध्या वापरात असणारी ‘बीएस-४’ निकषांवर आधारित वाहनांवर बंदी घालण्यात येणार नाही. मात्र, नव्याने बाजारात येणाऱ्या वाहनांमध्ये ‘बीएस-६’ मानकांचे पालन करणाऱ्या इंजिनाचा समावेश असणे बंधनकारक असणार आहे. याच दृष्टीने तयारी करत या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात चेन्नईस्थित व्यावसायिक वाहन निर्माता कंपनी अशोक लेलॅंडने ‘बीएस-६’ उत्सर्जन मानकांसह ट्रक आणि बस सुरू केल्या. नवीन उत्सर्जन मापदंडांसह अवजड वाहने रस्त्यावर आणणारी अशोक लेलॅंड ही पहिलीच भारतीय कंपनी ठरली. त्यामुळे ‘बीएस-६’ मानकांबाबतचा मुद्दा सध्या चांगलाच चर्चिला जात आहे. 

बीएस म्हणजे काय?

बीएस म्हणजे भारत स्टेज होय. या संकल्पनेचा संबंध थेट उत्सर्जन मानकांशी येतो. सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास ‘बीएस-६’ इंजिनयुक्त वाहनांमध्ये विशेष प्रकारच्या फिल्टरचा अंतर्भाव असणार असून, या माध्यमातून ८० ते ९० टक्के पर्टिक्‍युलेट मॅटर (पीएम) २.५ सारखे कण रोखले जातील. या माध्यमातून वातावरणात पसरणाऱ्या आणि प्रदूषण करणाऱ्या नायट्रोजन ऑक्‍साइडवर नियंत्रण मिळवणे शक्‍य होणार आहे. अर्थात देशातील प्रदूषणाची पातळी कमी करण्यात बीएस-६ वाहने महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
*बीएस-४ व बीएस-६ मधील फरक*
देशात सध्या विक्री होणाऱ्या गाड्यांमध्ये प्रामुख्याने ‘बीएस-४’ इंजिन वापरलेले असते. ‘बीएस-६’ इंजिनमधून ‘बीएस-४’ इंजिनांच्या तुलनेत कमी घातक पदार्थ वातावरणात सोडले जातील. ‘बीएस-४’ आणि ‘बीएस-३’ इंधनामध्ये सल्फरचे प्रमाण ५० पीपीएमपर्यंत असते. सल्फरचे हे प्रमाण मानवी आरोग्यासाठी खूपच घातक असते. मात्र, ‘बीएस-६’ इंधनामध्ये हेच प्रमाण १० पीपीएमपर्यंत घटविण्यात आले आहे. अर्थात बीएस-६ इंजिनमध्ये अत्याधुनिक एमीशन कंट्रोल प्रणाली बसविण्यात आल्याने प्रदूषणातील सल्फरचे प्रमाण बीएस-४ इंजिनच्या तुलनेत पाच पटीने कमी होणार आहे. त्यामुळे ‘बीएस-४’च्या तुलनेत ‘बीएस-६’ इंधनाच्या ज्वलनातून खूपच कमी प्रदूषण होण्याची शक्‍यता आहे. ‘बीएस-४’ इंजिन असणाऱ्या गाड्यांमधून निघणारा धूर हा डोळे, नाक यांची जळजळ होणे, फुप्फुसात श्वास घेण्यास त्रास होणे यांसारख्या समस्यांना आमंत्रण देतो. त्यामुळे प्रदूषण कमी करण्यासाठी सरकारकडून एप्रिल २०२० पासून सर्व वाहननिर्मिती कंपन्यांना आपल्या वाहनांमध्ये ‘बीएस-६’ इंजिन बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे हे इंजिन असणारी नवीन वाहने बाजारात आल्यानंतर नायट्रोजन ऑक्‍साईडचे उत्सर्जन डिझेल वाहनांमधून ६८ टक्के; तर पेट्रोलचलित वाहनांमधून २५ टक्‍क्‍यांपर्यंत कमी होणार आहे. त्यामुळे इंजिनच्या कार्यक्षमतेत वाढ होऊन, मायलेजमध्येदेखील वाढ होणार आहे.

ग्राहकांवर काय परिणाम होणार!

वाहन उद्योगातील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, वाहननिर्मिती कंपन्या आपल्या उत्पादनांना ‘बीएस-४’ मधून ‘बीएस-६’ मध्ये सुधारित करत आहेत. ‘बीएस-६’ इंजिनची आणि त्यातील इलेक्‍ट्रिकल वायरिंगची वाढती किंमत पाहता या सुधारित इंजिनमुळे गाड्यांच्या किमतीत वाढ होऊ शकते. यामध्ये प्रामुख्याने पेट्रोलचलित गाड्यांच्या किमतीमध्ये १० ते १५ टक्के वाढ होऊ शकते. डिझेलचलित गाड्यांच्या किमतीमध्ये अडीच लाख रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. मात्र, इंजिनाच्या कार्यक्षमतेत वाढ झाल्याने त्यातून होणारे उत्सर्जन कमी होणार आहे. नव्या वाहनांचे मायलेज हे अधिक असणार आहे. त्यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळणार आहे. तर ‘बीएस-६’ निकषांनुसार सादर करण्यात येणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रति लिटर दोन ते तीन रुपयांनी महागण्याचीही शक्‍यता आहे. 

कोणते वायू प्रदूषणकारी?

इंटर्नल कंबशन इंजिनमधून कार्बन डायऑक्‍साईड, कार्बन मोनोऑक्‍साईड, हायड्रोकार्बन आणि नायट्रोजन ऑक्‍साईडसारखे घातक वायू तयार होतात. त्याचप्रमाणे डिझेल आणि डायरेक्‍ट इंजेक्‍शन पेट्रोल इंजिनमधून पर्टिक्‍युलेट मॅटर (पीएम) तयार होतात. मात्र, ‘बीएस-६’ वाहनांमध्ये प्रदूषण कमी करण्यासाठी इंधन जाळणाऱ्या चेंबरमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्यामुळे ‘बीएस-६’ इंजिनमुळे प्रदूषणकारी वायू कमी प्रमाणात बाहेर पडतात. त्याचप्रमाणे पर्टिक्‍युलेट मॅटर आणि नायट्रोजन ऑक्‍साईडसारख्या घातक घटकांद्वारे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. याशिवाय ‘बीएस-४’मधील इंधनात सल्फरचे प्रमाण प्रति किलो ५० मिलिग्राम असायचे. जे आता ‘बीएस-६’ मध्ये १० मिलिग्रामपर्यंत कमी असणार आहे. 

वाहन उद्योगावरील परिणाम?

वाहनांची मागणी घटण्याबरोबरच प्रदूषण नियंत्रणासाठी बीएस-६ नियम लागू करण्यानेही वाहन उद्योगात मंदी आली असावी, असा अंदाज बांधला जात आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वाहन उद्योगात मंदी येण्यामागील कारणांमध्ये ‘बीएस-६’सुद्धा जबाबदार असल्याचे मत सप्टेंबर महिन्यात व्यक्त केले होते. ‘बीएस-६’ याच नियमांतर्गत तयार झालेली वाहने कंपन्यांना विकावी लागणार आहेत. त्यातच नव्या मापदंडांत अनेक गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. त्या मापदंडांनुसार इंधन वापरले जाईल. पण या उत्सर्जन मापदंडांना लागू करण्यासाठी जो संक्रमणकाळ दिला आहे, त्यावरून वाहन उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ चिंता व्यक्त करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 'BS-3' engine halts pollution