'BSF'च्या जवानास कुटुंबाचा पाठिंबा

वृत्तसंस्था
गुरुवार, 12 जानेवारी 2017

गृहमंत्रालयाने दिले होते आदेश
तेजबहाद्दूर यादव यांच्या कृत्याचा सविस्तर अहवाल डीआयजी रॅंकच्या अधिकाऱ्याने तयार केला असून, तसे निर्देश गृहमंत्रालयानेच दिले होते. आज हा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर सादर केला जाऊ शकतो. गृहमंत्री राजनाथसिंह यांनी या घटनेची नोंद घेऊन योग्य ती कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले आहे. दरम्यान, तेजबहाद्दूर यांच्या व्हिडिओमुळे वरिष्ठ अधिकारी अडचणीत येण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

नवी दिल्ली : सीमेवर तैनात असणाऱ्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना दिल्या जाणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या अन्नाचा पंचनामा करणाऱ्या कॉन्स्टेबल तेजबहाद्दूर यादव यांना त्यांच्या कुटुंबीयांनी पाठिंबा देत त्यांच्या कृत्याचे समर्थन केले आहे. केंद्र सरकारनेही गृहमंत्रालयाच्या अहवालातून काही बाबी हाती लागल्याचे म्हटले आहे. या प्रकरणाची आता उच्चपातळीवर चौकशी होऊ शकते.

कॉन्स्टेबल तेजबहाद्दूर यांच्या पत्नीने सांगितले की, ""त्यांनी जे काही केले त्यामध्ये काहीच चुकीचे नसून, त्यांनी केवळ सत्य समोर आणले आहे. केवळ चांगले अन्न आणि रोटी दिली जावी एवढीच त्यांची माफक मागणी आहे. आता माझ्या पतीला मनोरुग्ण ठरविले जात आहे. ते मनोरुग्ण होते, तर मग त्यांना सीमेवर का तैनात करण्यात आले होते? त्यांच्यावर उपचार का करण्यात आले नाहीत?'' तेजबहाद्दूर यांच्या मुलानेही चांगले अन्न मागणे हा गुन्हा नसल्याचे सांगत आपल्या पित्याला पाठिंबा दिला. त्यांच्यासोबत नेमके काय घडत आहे, हे आम्हाला तरी कसे कळणार? या घटनेची निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे असल्याचे त्याने सांगितले.

याबाबत बोलताना केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिज्जू म्हणाले, की सीमा सुरक्षा दलाकडून आम्हाला अंतरिम अहवाल प्राप्त झाला असून, काही बाबी नक्कीच लक्ष देण्याजोग्या आहेत. मला याबाबत आताच काही बोलायचे नाही; पण माध्यमांनी आणि जनतेने या घटनेचा नको तितका बाऊ करू नये, असे आवाहन मी यानिमित्ताने करू इच्छितो. यामुळे जवानांच्या मनोधैर्यावर परिणाम होऊ शकतो.

Web Title: BSF jawan gets family support