पाककडून जवानाचे अपहरण करून हत्या

Narender Kumar
Narender Kumar

श्रीनगर : पाकिस्तानी रेंजर्सनी सीमा सुरक्षा दलाच्या एका जवानाचे अपहरण करून नंतर त्याचा गळा चिरून हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर सीमाभागात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. हेड कॉन्स्टेंबल नरेंद्रकुमार (रा. हरियाणा) असे जवानाचे नाव असून त्यांना तीन गोळ्या लागल्याने गंभीर जखमी झाल्याचे निदर्शनास आले.

आंतरराष्ट्रीय सीमेलगत सांबा जिल्ह्यातील रामगड सेक्‍टरमध्ये मंगळवारी (ता. 18) सकाळी अकराच्या सुमारास सीमा सुरक्षा दलाच्या गस्तीपथकातील जवान सीमेलगत वाढलेले गवत कापत असताना पाकिस्तानी रेंजर्सनी या जवानांवर अचानक गोळीबार सुरू केला. यात एक जवान जखमी झाला. उर्वरित जवानांनी आघाडी सांभाळली आणि ते सुरक्षित ठिकाणी आले. मात्र त्याचवेळी एक जवान मागेच राहिला. सायंकाळ उशिरापर्यंत त्याच्या शोधार्थ मोहिम राबवण्यात आली, मात्र तो सापडला नाही. रात्री उशिरा त्या जवानाचा मृतदेह घटनास्थळी आढळून आला. बीएसएफने त्या जवानाची ओळख अद्याप सांगितली नाही. पाकिस्तानच्या गोळीबारात एक जवान हुतात्मा झाल्याची वार्ता काल दुपारीच पसरली होती, मात्र बीएसएफकडून दुजोरा दिला जात नव्हता. मात्र सायंकाळी उशिरा बीएसएफने अधिकृत दुजोरा दिला. या क्षेत्रात पाकिस्तानी रेंजर्सकडून आयइडीचा वापर तर केला गेला नाही, याची चौकशी बीएसएफचे अधिकारी करत आहेत. यादरम्यान बीएसएफच्या महासंचालकांनी आज घटनास्थळाला भेट दिली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीएसएफचे चार ते पाच जवान माजरा वन पोस्ट (आघाडीची चौकी) येथे गवत काढण्यासाठी गेले होते. त्याचवेळी पाकिस्तानी रेंजरनी गोळीबार केला. हल्ला होताच पाकिस्तानच्या रेंजरनी त्यांना कव्हर फायरिंग केले. या गोळीबारात एक जवान जखमी झाला. बॅट टिमचे सदस्य हे जखमी जवानाला घेऊन गेले. तब्बल दोन तासापेक्षा अधिक काळ त्यांनी जखमी जवानाला ओलीस ठेवले आणि नंतर हत्या केली. जवानाच्या मृतदेहाबरोबर विटंबना केल्याचे उघडकीस आले आहे. त्याचा एक हात, पाय आणि डोळा काढण्याचा घृणास्पद प्रकार पाकिस्तानने केल्याचे वृत्त आहे, मात्र त्यास दुजोरा दिला जात नाही. जवानाचा मृतदेह येईपर्यंत रामगडच्या रुग्णालय परिसरात नागरिकांनी गर्दी केली होती.

नरेंद्रकुमार यांची जन्मतारीख 2 जून 1968 आहे. ते 176 बटालियनमध्ये होते. 15 मार्च 1990 रोजी ते सीमा सुरक्षा दलात दाखल झाले होते. त्यांच्या मागे पत्नी संतोष देवी व मोहित कुमार व अंकित कुमार दोन मुले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com