लोकसभा-विधानसभा निवडणुका यापुढे एकत्र; मोदींचे संकेत

टीम ई सकाळ
मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017

छातीवर हात ठेवून स्वतःला विचारा सर्जिकल स्ट्राईकच्या आधी 24 तास राजकारण्यांनी काय काय विधाने केली. आपल्या देशाच्या सैन्याचे जितके कौतूक करावे, तितके कमी आहे. इतका यशस्वी सर्जिकल स्ट्राईक आपल्याला (विरोधी पक्ष) त्रास देतो आहे, हे मला दिसते आहे. आतल्या आत तुम्ही अस्वस्थ आहात. मात्र, लष्कर आपल्या राष्ट्राच्या संरक्षणासाठी सक्षम आहे.

नवी दिल्लीः लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका एकाचवेळी घेण्याचा विचार केंद्र सरकार करीत असल्याचे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (मंगळवार) दिले. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपती प्रवण मुखर्जी यांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मोदी यांनी हा विचार लोकसभेत बोलून दाखविला. नोटाबंदी, काळा पैसा आणि सर्जिकल स्ट्राईकच्या मुद्द्यावर त्यांनी काँग्रेसला लक्ष्य केले.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाचवेळी घेण्याची वेळ आता आली आहे. एक कोटींहून अधिक सरकारी कर्मचारी निवडणुकांमध्ये गुंतून पडतात. शाळा-कॉलेजचे कर्मचारी निवडणुकीच्या कामात असतात. शिक्षणावर परिणाम होतो. आर्थिक फटका बसतो. 2014 च्या लोकसभा निवडणुकांच्या प्रक्रियेसाठी तब्बल चार हजार कोटी खर्च झाले. गरीब देशावर निवडणुकांचा इतका खर्च परवडणारा नाही, असे पंतप्रधान मोदी यांनी लोकसभेत सांगितले.

छातीवर हात ठेवून स्वतःला विचारा सर्जिकल स्ट्राईकच्या आधी 24 तास राजकारण्यांनी काय काय विधाने केली. आपल्या देशाच्या सैन्याचे जितके कौतूक करावे, तितके कमी आहे. इतका यशस्वी सर्जिकल स्ट्राईक आपल्याला (विरोधी पक्ष) त्रास देतो आहे, हे मला दिसते आहे. आतल्या आत तुम्ही अस्वस्थ आहात. मात्र, लष्कर आपल्या राष्ट्राच्या संरक्षणासाठी सक्षम आहे, असे प्रतिपादन मोदी यांनी करताच काँग्रेस सदस्यांनी लोकसभेत आरडाओरडा केला.

नोटाबंदीवर विरोधकांनी आठ नोव्हेंबरपासून देशभर भाजपविरोधी रान उठविले आहे. त्याचा समाचार घेताना मोदी यांनी लोकसभेतील विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जून खरगे यांच्या विधानाचा संदर्भ घेतला. काळा पैसा रोख रकमेत नाही, तर बेनामी मालमत्ता, सोन्या-चांदीत दडलेला आहे, असे खरगे यांनी आधी मोदी सरकारवर टीका करताना म्हटले होते. त्याला उत्तर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले, काळा पैसा कुठे आहे, याची नेमकी माहिती आपल्याकडे (खरगेंकडे) कशी? जे बारकाईने आर्थिक परिस्थितीचे अवलोकन करतात त्यांनी लक्षात घ्यावे की मे 2014 च्या आधी पैसा किती बाहेर गेला याची चर्चा व्हायची. आता, किती पैसा (भारतात परत) आला याची चर्चा होते आहे. भ्रष्टाचाराची सुरवात रोख पैशातून होते. बेनामी संपत्ती, सोने-चांदीच्या रुपात काळा पैसा जमा होतो. 1988 मध्ये काँग्रेसचे देशभर बहुमत होते, तेव्हा काँग्रेसने बेनामी संपत्तीचा कायदा बनविला. गेली 26 वर्षे काँग्रेसने हा कायदा संमत का केला नाही. आमच्या सरकारने हा कायदा संमत करून अंमलात आणायला सुरूवात केली.

काँग्रेस सरकार आणि भाजप सरकारमधील फरक मांडताना मोदी यांनी आपल्या भाषणात वारंवार कार्यसंस्कृतीचा उल्लेख केला. भाजप सरकारने कार्यसंस्कृती बदलली आहे आणि त्याचा लाभ विविध योजनांच्या अंमलबजावणीतून देशवासियांना होत आहे, असा दावा त्यांनी केला.

मोदी म्हणाले, देशात खूप नागरिक आहेत, जे स्वातंत्र्यानंतर जन्माला आले आहेत. या सदनातही तसे अनेक सदस्य आहेत. आम्हाला स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होता आले नाही. मात्र, देशासाठी जगण्याचे सौभाग्य लाभले आहे. लालबहाद्दूर शास्त्री यांनी देशासाठी अन्नत्यागाचे आवाहन केले होते. त्यानंतरच्या नेत्यांनी लोकांचे सामर्थ्य ओळखणे सोडून दिले. माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीने आवाहन केले, की ज्यांना शक्य आहे, त्यांनी गॅसची सबसिडी सोडून द्यावी. या गॅस सबसिडी सोडण्याच्या आवाहनाला देशातील तब्बल 1.20 कोटी लोकांनी प्रतिसाद दिला. आपण आपल्या देशवासियांच्या ताकदीला ओळखला पाहिजे. तरच जनआंदोलनाचे सकारात्मक वातावरण आपण निर्माण करू शकतो.'

संसदेत मी बोललो, तर भूकंप होईल, असे विधान काँग्रेस उपाध्यक्ष राहूल गांधी यांनी नोटाबंदीनंतरच्या काळात केले होते. तो संदर्भ घेऊन मोदी म्हणाले, भूकंपाची धमकी खूप आधीच दिली होती, मात्र प्रत्यक्षात काही घडले नाही.

लोकशाही आणि जनशक्तीच्या कृपेमुळेच एका गरीब आईचा मुलगा पंतप्रधान बनू शकला, असे सांगून मोदी यांनी 'देशातील लोकशाही एका परिवारावरच सोपविली गेली होती,' अशा शब्दांत काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यावर नाव न घेता टीका केली.

मोदी यांनी विरोधकांच्या प्रश्नांना आपल्या भाषणात दिलेली उत्तरे अशीः

अर्थसंकल्पः

 • महिनाभर आधी घेण्याच्या निर्णयाचे समर्थन.
 • शेतकऱयाच्या फायद्यासाठी अर्थसंकल्प आधी घेतला
 • कित्येक वर्षे अर्थसंकल्प संध्याकाळी पाच वाजता सादर होत होते.
 • ही प्रथा ब्रिटीश काळातली. ब्रिटीश पार्लमेंटच्या वेळेच्या सोयीसाठीची ही प्रथा होती.
 • अटलजींच्या सरकारने अर्थसंकल्प संध्याकाळी सादर करण्याची ब्रिटीशकालीन प्रथा बंद केली.
 • 90 वर्षांपूर्वी रेल्वे अर्थसंकल्प यायचे तेव्हा दळवळणाचे तेच एक प्रमुख साधन होते.
 • आज दळणवळणात खूप बदल झाले आहेत.
 • दळणवळण क्षेत्राचा एकत्रित विचार व्हावा म्हणून रेल्वे अर्थसंकल्प मुख्य अर्थसंकल्पचा भाग बनविला.

नोटाबंदीः

 • बेनामी संपत्तीचा कायदा काँग्रेसने 26 वर्षे गुंडाळून ठेवला.
 • काँग्रेसला नंतर लक्षात आले असावे की फायदा कायदा दाबून ठेवण्यात आहे.
 • आपण कितीही ताकदवान असाल, तरी गरीबांच्या हक्काचे गरीबांना द्यावेच लागणार आहे.
 • मी गरीबांसाठी लढतो आहे, लढत राहणार.
 • देशात समांतर अर्थव्यवस्था तयार झाली होती.
 • यशवंतराव चव्हाणांनी हा विषय तत्कालिन नेतृत्वासमोर नेला होता.
 • आपल्याला निवडणुकीची काळजी आहे, असे सांगत काँग्रेसने समांतर अर्थव्यवस्थेला जीवनाचा भाग बनविले.
 • देशात वर्षभरात जेवढी आर्थिक उलाढाल होते, त्यातील सर्वाधिक दिवाळीत होते.
 • त्यानंतरच्या काळात उलाढाल मंदावते. म्हणूनच दिवाळीनंतर नोटाबंदी केली.
 • रोकडीच्या वाहतुकीसाठी मोठा खर्च येतो. ही यायातात कॅशलेसमुळे वाचणार आहे.

काळा पैसा, भ्रष्टाचारः

 • भ्रष्टाचाराविरोधात माझ्या सरकारने आल्यापासून काम सुरू केले.
 • भ्रष्टाचाराविरोधात 'एसआयटी' बनविली.
 • 24 मार्च 2014 ला सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते, की विदेशातील काळा पैसा परत आणण्यात सरकार अपयशी ठरले आहे.
 • पैसा परत आणण्याच्या आदेशाचे काय केले, अशी विचारणाही न्यायालयाने केली होती.
 • पूर्वी आवाज यायचा की किती पैसा गेला (विदेशात)...आता आवाज येतो, की किती पैसा आला...
 • 'मनरेगा'चे नियम 1,035 वेळा नियम बदलले गेले आहेत. का असे बदल काँग्रेसने केले?

'नीम कोटेड' युरियाः

 • गेल्या दोन वर्षांत कुठल्याही मुख्यमंत्र्याला युरियाची टंचाई भासली नाही.
 • देशात कुठेही रांगा लागलेल्या नाहीत. लाठीमार करावा लागला नाही. शेतकऱयांना युरिया सहज मिळतो आहे.
 • पंतप्रधान पीक विमा योजनेचा फायदा शेतकऱयांपर्यंत पोहोचविण्यासाठी संसदेच्या प्रत्येक सदस्याने प्रयत्न केले पाहिजेत.
 • मृदा आरोग्य पत्रिकेचे (Soil health card) महत्व शेतकऱयांना समजावून सांगितले पाहिजे.

सरकारची कामगिरीः

 • 76,000 गावांमध्ये ऑप्टिकल फायबर नेटवर्क पसरले आहे.
 • गेल्या दोन वर्षांत आम्ही वीज उत्पादन क्षमता वाढविली. अपारंपरिक उर्जेची निर्मिती वाढविली.
 • पारेषण सुव्यवस्थित केली. सौर उर्जेचे प्रमाण वाढविले.
 • उदय योजनेअंतर्गत राज्यांना 1.60 हजार कोटी रूपयांचा फायदा करून दिला.
 • रेल्वेच्या कोळसा वाहतुकीतून आम्ही पैसा वाचविला.
 • एलईडी बल्बच्या किमती कमी केल्या. 21 कोटी एलईडी बल्ब देशभरात लावले. त्यातून 11 हजार कोटींची बचत
 • मागासवर्गीय जनतेच्या प्रगतीसाठी आम्ही यावर्षी 52,293 कोटींची योजना यावर्षी सादर केली.
 • 17 मंत्रालयांच्या 84 योजना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फरशी जोडल्या. त्यातून 32 कोटी लोकांना 1.56 हजार कोटी रूपयांचा थेट लाभ दिला.
 • गॅस सबसिडी आधार योजनेला जोडले तेव्हा 26,000 कोटी रूपयांच्या निधीची गळती रोखता आली.
 • तंत्रज्ञान वापरून 3.94 लाख बनावट रेशनकार्ड पकडले. त्यातून 14,000 कोटी रूपयांच्या दलालीला आळा बसला. हा पैसा मुख्य प्रवाहात आला.
 • मनरेगामध्ये आधार कार्डद्वारे थेट पैसा खात्यात करून 7,636 कोटी रूपयांचा वाया जाणारा निधी रोखला गेला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Budget session of Parliament