अर्थसंकल्पी अधिवेशन भाजपसाठी शुभ

Narendra Modi
Narendra Modi

नवी दिल्ली - संसदेचे अर्थसंकल्पी अधिवेशन भाजपसाठी विजयवार्ता आणणारे व शुभ ठरले, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. भाजप संसदीय पक्षाच्या या अधिवेशनातील अखेरच्या बैठकीत बोलताना त्यांनी देशातील बदलाचे व विकासाचे प्रतिनिधी व संवादक व्हा, असा संदेश स्वपक्षीय खासदारांना दिला. 

बालयोगी सभागृहात झालेल्या या बैठकीत शिक्षणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी "स्मार्ट हेकेथॉन' या योजनेबाबत माहिती दिली. वेंकय्या नायडू यांनी मोदी हे देवदूत असल्याची देशवासीयांची भावना उत्तर प्रदेश व उत्तराखंडच्या मतदारांनी ठळकपणे व्यक्त केल्याचे सांगितले. भाजप आघाडीच्या काल झालेल्या बैठकीतही मोदी यांच्या नेतृत्वावर सर्व घटकपक्षांनी दृढ विश्वास व्यक्त केल्याचेही ते म्हणाले. आगामी पावसाळी अधिवेशनाच्या मधे असलेल्या किमान तीन महिन्यांत मोदी सरकारचे उपक्रम, योजना जनतेपर्यंत पोचवा, असेही नायडू म्हणाले. 14 एप्रिलला राज्यघटनाकारांच्या जयंतीला भव्य मेळावे घेऊन "भीम' ऍपचा जास्तीत जास्त प्रचार करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. त्याचप्रमाणे 24 ते 26 मे दरम्यान सरकारचा तृतीय वर्षपूर्ती समारंभ आपापल्या मतदारसंघांत दणक्‍यात साजरा करण्याच्याही सूचना भाजप खासदारांना देण्यात आल्या. 

संसदेच्या अधिवेशनाचे सूप उद्या (ता. 12) वाजणार आहे. या अधिवेशनात, विशेषतः राज्यसभेत तुलनेने चांगले कामकाज झाले याकडे मोदींनी लक्ष वेधले. आपल्या संसदीय रणनीतीकारांनी राज्यसभेतील अडथळे दूर केले असे सांगून त्यांनी सभागृहनेते अरुण जेटली व संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांच्या पाठीवर थाप दिली. 

मोदी म्हणाले, की भाजप सरकारला पुढच्या महिन्यात तीन वर्षे पूर्ण होत असताना जनतेचा सरकारबद्दलचा दृष्टिकोन कमालीचा सकारात्मक झाला आहे व त्याचेच प्रतिबिंब अधिवेशनाच्या सुरळीतपणात पडले. लोकांनी निवडून दिले त्याचा उपयोग समाजातील वंचितांसाठी व गरिबांसाठी जास्तीत जास्त करण्याची ही आपल्यासाठी सुवर्णसंधी आहे. 

संसदीय कामकाजमंत्री अनंतकुमार म्हणाले, की या अधिवेशनात "जीएसटी', ओबीसी व फॅक्‍टरी विधेयकांसह लोकसभेत 21, तर राज्यसभेत आतापावेतो 16 (व एकूण 18 ते 19) विधेयके मंजूर झाली याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. अधिवेशनाच्याच काळात झालेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा जो कल आला त्याबद्दलही पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. 

हनुमानापासून प्रेरणा घ्या... 
आज हनुमान जयंती असल्याने विशेषतः भाजपच्या बैठकीत त्याचा संदर्भ येणे अपरिहार्य होते. मोदींनी आज सकाळीच दिल्लीतील प्राचीन हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतले. बैठकीत त्यांनी हनुमंताचे वर्णन "सर्वाधिक समर्पित समाजसेवक' असे केले. समाजाची निरपेक्ष सेवा करण्याचे उत्तम उदाहरण म्हणजे हनुमान आहे व भाजप कार्यकर्त्यांनी त्याच्यापासून प्रेरणा घ्यावी, असेही ते म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com