नोटाबंदीमुळे जनतेचा सरकारवरील विश्वास वाढला- राष्ट्रपती

वृत्तसंस्था
गुरुवार, 31 जानेवारी 2019

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. यावेळी त्यांनी नोटाबंदीचे स्वागत करताना नोटाबंदीमुळे जनतेचा सरकारवरील विश्वास वाढला असल्याचे सांगितले.

नवी दिल्ली- राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. यावेळी त्यांनी नोटाबंदीचे स्वागत करताना नोटाबंदीमुळे जनतेचा सरकारवरील विश्वास वाढला असल्याचे सांगितले.

मोदी सरकारच्या कार्यकाळातले हे अखेरचे अधिवेशन असून उद्या पीयूष गोयल संसदेत हंगामी अर्थसंकल्प मांडण्याची शक्यता आहे. अर्थमंत्री अरुण जेटली उपचारांसाठी अमेरिकेत गेल्याने गोयल यांच्याकडे अर्थखात्याचा हंगामी कार्यभार सोपवण्यात आला आहे. राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणात मोदी सरकारच्या कामांचा लोखाजोखा मांडला. ते म्हणाले की, पहिल्या दिवसापासूनच सरकारचे ध्येय होते की, समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत सोयी-सुविधा पोहोचाव्यात. मोदी सरकारने सत्तेत आल्यापासून नवीन भारत बनवण्याच संकल्प सोडला होता. त्यानुसार गेल्या साडेचार वर्षात प्रयत्न करण्यात आले. महात्मा गांधींच्या 125 व्या जयंतीनिमित्त सरकारने देशाला संपूर्ण स्वच्छ बनवण्याचा संकल्प घेतला. त्यानुसार, स्वच्छ भारत योजनेतून 09 कोटींपेक्षा अधिक शौचालायांची निर्मिती करण्यात आली.

राष्ट्रपती कोविंद पुढे म्हणाले की, प्रत्येक गावात गॅस कनेक्शन, सर्वशिक्षा अभियान, सर्वांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याकडे सरकारनं लक्ष्य दिलं आहे. या लक्ष्यांची पूर्तता करण्यासाठी सरकारनं अनेक योजना तयार केल्या आहेत. शेतकऱ्यांचं देशाच्या विकासात मोठं योगदान आहे. शेतकऱ्यांना मदत करणं ही सरकारची प्राथमिकता आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचा सरकार प्रयत्न करणार आहे. माझं सरकार मच्छीमाऱ्यांना प्रशिक्षणही देत आहे. कृषी क्षेत्रातही व्यापक बदल केले जात आहेत. मुद्रा योजनेचा लाभ सर्वाधिक महिलांना मिळाल्याचंही राष्ट्रपतींनी यावेळी अधोरेखित केले.

प्रधानमंत्री आवास योजनेद्वारे ग्रामीण आणि नागरी भागात घरांच्या निर्मितीला सुरुवात केली. ग्रामीण भागात 01 कोटी 30 लाख घरांची निर्मिती करण्यात आली. काळ्या पैशामुळे सर्वसामान्यांचे घरांचे स्वप्न पूर्ण होण्यास अडचणी येत होत्या. मात्र, रेरा कायद्यामुळे त्यांना वेळेत घर उपलब्ध होऊ शकत आहे. त्याचबरोबर उज्वला योजनेतून 02 कोटी 47 लाख घरांमध्ये वीजेचे कनेक्शन देण्यात येत आहे. अटलजींच्या दुरदृष्टीवर चालताना सरकारने गेल्या साडेचार वर्षांत दिव्यांगांसाठी मदत उपकरणांचे वाटप सुरु केले. सुगम्य भारत योजनेंतर्गत दिव्यांगांसाठी सरकारी कार्यालये, रेल्वे स्थानकांत सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारच्या 100 वेबसाईट्समध्ये दिव्यांगांच्या सोयीप्रमाणे बदल करण्यात आला असल्याचेही राष्ट्रपती कोविंद यांनी यावेळी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: budget session updates day 1 parliament lok sabha rajya sabha by ramnath kovind