'इज ऑफ लिव्हिंग'वर भर देणारा अर्थसंकल्प: नरेंद्र मोदी

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

देशातील शेतकऱ्यांनी या वर्षी रेकॉर्ड उत्पादन केले आहे. देशातील शेतकऱ्याची स्थिती आणखी मजबूत करण्यासाठी या अर्थसंकल्पामध्ये अनेक पाऊले उचलण्यात आली आहेत. गाव आणि कृषी क्षेत्रांच्या विकासासाठी तब्बल साडेचौदा लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे

नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा भारताचा पाया अधिक भक्‍कम करणारा असल्याचे प्रशस्तिपत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (गुरुवार) दिले. अर्थसंकल्प संसदेत मांडण्यात आल्यानंतर पंतप्रधान हे पत्रकारांशी संवाद साधत होते. हा अर्थसंकल्प हा अन्नप्रक्रिया ते फायबर ऑप्टिक्‍स, रस्ते ते जहाजबांधणी, तरुणाई ते वृद्ध नागरिक, ग्रामीण भारत ते आयुष्मान भारत, डिजिटल भारत ते स्टार्ट अप इंडिया अशा सर्व क्षेत्रांशी संबंधित असलेल्या कोट्यवधी भारतीयांच्या आशा व महत्त्वाकांक्षांना बळ देणारा असल्याची प्रतिक्रिया पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केली.

पंतप्रधान म्हणाले -

  • शेतकरी, आदिवासी, दलित समुदायांना या अर्थसंकल्पांमधून फायदा होईल. ग्रामीण भारतासाठी या अर्थसंकल्पाच्या माध्यमामधून रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील.
  • देशातील शेतकऱ्यांनी या वर्षी रेकॉर्ड उत्पादन केले आहे. देशातील शेतकऱ्याची स्थिती आणखी मजबूत करण्यासाठी या अर्थसंकल्पामध्ये अनेक पाऊले उचलण्यात आली आहेत. गाव आणि कृषी क्षेत्रांच्या विकासासाठी तब्बल साडेचौदा लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
  • देशामधील शेतकऱ्यांसाठी "ऑपरेशन ग्रीन' हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा असेल. देशातील दुग्धक्रांतीसारखाच शेतकऱ्यांना या ऑपरेशनचा मोठा फायदा होईल.
  • शेतीच्या विकासाबरोबरच या अर्थसंकल्पामध्ये देशातील गरीब व मध्यमवर्गांची चिंता दूर करणारी आरोग्य योजना आहे
  • या अर्थसंकल्पामध्ये केवळ इज ऑफ डुईंग बिझनेसच नव्हे; तर इज ऑद इज ऑफ लिव्हिंगवरही भर देण्यात आला आहे
  • 51 लाख नवी घरे, दोन कोटी शौचालये, सुमारे पावणे दोन कोटी वीज जोडणी अशा सर्व योजनांचा थेट लाभ देशातील गरीब, वंचित व शोषित घटकांमधील आपल्या बंधुभगिनींना मिळणार आहे. यामुळे गामीण भागमध्ये रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. शेतकऱ्यांना दीडपट हमीभाव दिल्याची घोषणा केल्याबद्दल मी अर्थमंत्र्यांचे विशेष अभिनंदन करतो. यासंदर्भात राज्य सरकारांशीही चर्चा करण्यात येईल
Web Title: Budget2018 Narendra Modi Arun Jaitley India