हिमाचल प्रदेशात इमारत कोसळून दोन ठार; 22 जणांना वाचवण्यात यश

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 जुलै 2019

हिमाचल प्रदेशात अतिवृष्टीचा जोर वाढला असून, कुमारहत्ती येथे रविवारी एक बहुमजली इमारत कोसळून दोघे जण ठार झाले, तर अन्य 22 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे, अशी माहिती महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक कम विशेष सचिव डी. सी. राणा यांनी दिली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आणखी पंधरा जण अडकल्याची भीती व्यक्त होत असून, अन्य दहा जणांना मात्र सुखरूपपणे बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले आहे.

सोलन - हिमाचल प्रदेशात अतिवृष्टीचा जोर वाढला असून, कुमारहत्ती येथे रविवारी एक बहुमजली इमारत कोसळून दोघे जण ठार झाले, तर अन्य 22 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे, अशी माहिती महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक कम विशेष सचिव डी. सी. राणा यांनी दिली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आणखी पंधरा जण अडकल्याची भीती व्यक्त होत असून, अन्य दहा जणांना मात्र सुखरूपपणे बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले आहे. या घटनेनंतर राष्ट्रीय आपत्ती कृती दलाचे पथक तातडीने घटनास्थळी रवाना झाले.

दरम्यान, या गेस्ट हाऊसवर जवान आपल्या कुटुंबियांसमवेत जेवण्यासाठी थांबले होते अशी माहिती आहे. हिमाचलमधील सोलन भागात कुमारहट्टी-नाहन महामार्गाजवळ असलेल्या सेहज ढाबा आणि गेस्ट हाऊसची इमारत जोरदार पावसाने कोसळली आहे. प्रशासनाला माहिती मिळताच घटनास्थळी स्थानिकांच्या मदतीने बचावकार्याला सुरूवात केल्याने 22 लोकांचा जीव वाचवण्यात यश आले.  

मागील काही दिवसांपासून या भागामध्ये मुसळधार पाऊस होत आहे. अशाच प्रकारची घटना शनिवारी सुद्धा घडली होती. या परिसरात झालेल्या पावसाने मागील सर्व विक्रम तोडल्याचे सांगण्यात येत आहे. 

नद्या आणि नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आल्याने पाणी रस्तावर आले आहे.  या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर घरांमध्ये तसेच हॉटेलमध्ये पाणी घुसले आहे. यामुळे प्रवाशांचे आणि स्थानिकांचे हाल होत आहे. दरम्यान सोलन-चायल हा मार्ग बंद असल्याने नागरिकांना त्रासाला सामोर जावे लागत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: building collapse in himachal pradesh