बुलेट ट्रेन धावणारच : पीयूष गोयल

वृत्तसंस्था
बुधवार, 13 जून 2018

देशाची रेल्वे 
धोकादायक क्रॉसिंग सुरक्षित : 1220 
विद्युतीकरण : 30 हजार किलोमीटर 
वार्षिक विद्युतीकरणाचे प्रमाण : 4087 
स्थानकावर वायफाय : 675 
वायफायसाठी प्रस्तावित स्थानके : 2 लाख 

नवी दिल्ली - देशाचा विकास काही लोकांना बघवत नाही व सहन होत नाही. त्यामुळेच मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला विरोध होत आहे. मात्र कितीही विरोध झाला तरी बुलेट ट्रेन धावणार व निर्धारित वेळेतच धावणार, अशा शब्दांत रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी शिवसेना व मनसेला प्रत्युत्तर दिले. रेल्वेचे खासगीकरण करण्याचा कोणताही विचार नाही व रेल्वे सुरक्षेच्या जीआरएफ व आरपीएफ या पोलिस दलांचे विलीनीकरण करण्याचाही प्रस्ताव नाही, असेही गोयल म्हणाले. 

गोयल यांनी रेल्वे प्रवाशांसाठी मदत हे मोबाईल ऍप्लिकेशन तसेच भोजन देणाऱ्या ऍपचे उद्‌घाटन केले. सरासरी 10 ते 24 तास विलंबाने धावणाऱ्या गाड्या, प्रवाशांचे हाल, वाढते अपघात, स्वच्छ भारतातील अस्वच्छ रेल्वेगाड्या आदी विषयांवर गोयल यांनी "दीर्घकालीन व मोठ्या बदलांसाठी छोटे छोटे त्रास सहन करावेच लागणार व जनतेची त्यासाठी तयारी आहे,' असे म्हणत परिस्थितीचे समर्थन केले. त्यांनी सांगितले, की मुंबई लोकलच्या धर्तीवर देखभाल दुरुस्तीसाठी घेण्यात येणाऱ्या "ब्लॉक'च्या वेळा निश्‍चित करा, अशी सूचना आपण रेल्वे बोर्डाला केली आहे. मुंबईत रात्री तीन तास लोकलसेवा बंद असते. त्याच धर्तीवर देशाच्या विविध विभागांतही ब्लॉकच्या वेळा निश्‍चित करता येतील काय, याची चाचपणी सुरू आहे.

बुलेट ट्रेनबद्दल गोयल म्हणाले, की काही लोकांना विकास व आधुनिकता बघवत नाही. सुमारे 50 वर्षांपूर्वी राजधानी एक्‍सप्रेस सुरू झाल्या तेव्हाही असाच विरोध झाला होता. मात्र विरोध होतो म्हणून बुलेट ट्रेनसारखे जागतिक पातळीवरील तंत्रज्ञान आणण्याची योजना थांबणार नाही. प्रवासी गाड्यांचा वेग सरासरी 25 टक्‍क्‍यांनी वाढविण्याची योजना आहे. विनाफाटक रेल्वे क्रॉसिंग्जचे संकट 2018 च्या अखेरपर्यंत समूळ नष्ट करण्यात येणार असून आतापावेतो 5479 विनाफाटक रेल्वे क्रॉसिंग्ज सुरक्षित करण्यात आली आहेत. 

रेल्वेचेही "गांधी वर्ष' 
महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त रेल्वेही 2019 हे "गांधी वर्ष' म्हणून साजरे करणार आहे. हे वर्ष महात्मा गांधींना समर्पित राहील, असे सांगून रेल्वेमंत्री म्हणाले की, न्यू इंडियाच्या निर्मितीसाठी भारत सज्ज असून यासाठी गांधीविचार सर्वांत महत्त्वाचा आहे. रेल्वे मंत्रालयही त्याच दिशेने योजना आखणार आहे. "जगात जे बदल तुम्हाला अपेक्षित होत ते आधी स्वतःपासून सुरू करा,' हा गांधीविचार हीच रेल्वेची कॅचलाईन असेल, असेही त्यांनी नमूद केले. 

देशाची रेल्वे 
धोकादायक क्रॉसिंग सुरक्षित : 1220 
विद्युतीकरण : 30 हजार किलोमीटर 
वार्षिक विद्युतीकरणाचे प्रमाण : 4087 
स्थानकावर वायफाय : 675 
वायफायसाठी प्रस्तावित स्थानके : 2 लाख 

Web Title: The bullet train will run on any rsisk says Piyush Goyal