राहुल गांधींचे लक्ष आता 2019 कडे 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 15 जानेवारी 2018

राज्यातील पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते यांच्याशी त्यांचा चांगला संवाद आहे. त्यामुळे येत्या लोकसभेला राहुल गांधी यांच्यासमवेत मोठ्या ताकदीनिशी मैदानात उतरण्यास आम्ही सज्ज आहोत. लोकसभा निवडणुकीत आम्ही सर्व कार्यकर्ते पक्षाला उत्तर प्रदेशात उभारी देण्याचे काम करू. गेल्या वर्षी उत्तर प्रदेश विधानसभेत कॉंग्रेसची कामगिरी खराब राहिली आहे.

लखनौ : गुजरात विधानसभा निवडणुकीत पक्षाला उभारी देणाऱ्या कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे लक्ष आता पुढच्या वर्षी, 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर आहे. राहुल गांधी उद्या, सोमवारपासून दोन दिवसांच्या अमेठी दौऱ्यावर येत आहेत. 

कॉंग्रेस अध्यक्ष झाल्यानंतर राहुल गांधी प्रथमच अमेठीला जात आहेत, त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांत प्रचंड उत्साह आहे. मात्र उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांतील कॉंग्रेसची कामगिरी पाहता उत्तर प्रदेशात राहुल गांधी यांची वाट सोपी नाही, हेही कार्यकर्त्यांना ठाऊक आहे. गेल्यावर्षी विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाशी हातमिळवणी करून निवडणूक लढवणाऱ्या कॉंग्रेस पक्षाच्या पदरी निराशा पडली होती. कॉंग्रेस प्रवक्ते अमरनाथ म्हणाले, की राहुल गांधींना उत्तर प्रदेशची चांगली माहिती आहे.

राज्यातील पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते यांच्याशी त्यांचा चांगला संवाद आहे. त्यामुळे येत्या लोकसभेला राहुल गांधी यांच्यासमवेत मोठ्या ताकदीनिशी मैदानात उतरण्यास आम्ही सज्ज आहोत. लोकसभा निवडणुकीत आम्ही सर्व कार्यकर्ते पक्षाला उत्तर प्रदेशात उभारी देण्याचे काम करू. गेल्या वर्षी उत्तर प्रदेश विधानसभेत कॉंग्रेसची कामगिरी खराब राहिली आहे. राज्यात 403 पैकी केवळ सात जागा पक्षाच्या पदरात पडल्या. त्याचबरोबर कॉंग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या अमेठी आणि रायबरेली येथे लाजिरवाणा पराभवही पत्करावा लागला. पक्षाला दोन्ही जिल्ह्यांत दहापैकी दोनच जागा मिळाल्या. या पार्श्‍वभूमीवर राहुल गांधी यांचा दौरा आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी पूरक ठरेल, अशी अपेक्षा कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. राहुल गांधी हे अमेठी मतदारसंघात सात ठिकाणी रोड शो करतील असे पक्षाच्या प्रवक्‍त्यांनी सांगितले. दोन दिवसांच्या दौऱ्यावर येणारे राहुल गांधी हे उद्या (ता. 15) रायबरेलीमार्गे सालोन येथे दुपारी पोचतील. तेथे नगर पंचायत येथे जाहीर सभेला मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर अमेठीला रवाना होतील. दुसऱ्या दिवशी (मंगळवारी) सकाळी राहुल गांधी हे मुसाफिरखाना येथे नागरिकांशी संवाद साधतील. त्यानंतर जैस, जगदीशपूर आणि मोहनगंजचा दौरा करतील. 

Web Title: Buoyed by Gujarat show Rahul Gandhi to focus on UP Congress ahead of 2019 elections