ओडिशात बस दरीत कोसळून चार जण मृत्युमुखी

वृत्तसंस्था
बुधवार, 24 जानेवारी 2018

मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी आज मृतांच्या नातेवाइकांना दोन लाखांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली. त्याचप्रमाणे जखमींवर मोफत उपचार करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले

संभलपूर  - संभलपूर जिल्ह्यात काल (मंगळवारी) रात्री पुलाच्या कठड्याला बस धडकून दरीत कोसळल्याने चार जण मृत्युमुखी पडले; तर अन्य 32 जण जखमी झाले. येथील राष्ट्रीय महामार्गावरील गौंडपल्ली गावाजवळ काल रात्री हा अपघात झाला. ही बस संभलपूरहून रायरंगपूर येथे चालली होती.

चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने ती पुलाच्या कठड्याला धडकून दरीत कोसळली, असे पोलिसांनी सांगितले. या अपघातामध्ये चार जण जागीच मृत्युमुखी पडले. जखमींना जिल्हा मुख्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी आज मृतांच्या नातेवाइकांना दोन लाखांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली. त्याचप्रमाणे जखमींवर मोफत उपचार करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

Web Title: bus accident odisha india