बायोगॅसवर चालणाऱ्या बस आजपासून गोव्यातील रस्त्यांवर

अवित बगळे
बुधवार, 16 ऑगस्ट 2017

या बसगाड्यांचा प्रयोग यशस्वी झाल्यास प्रदूषण निर्मूलनाच्यादृष्टिने तो मैलाचा दगड ठरणार आहे. याच कंपनीच्या बायो इथॅनॉलवर चालणाऱ्या बसेस सध्या नागपूर महापालिकेच्या ताफ्यात आहेत.

पणजी : बायोगॅसचा इंधन म्हणून वापर करुन त्यावर चालणाऱ्या बसगाड्या आजपासून गोव्यातील रस्त्यांवर धावू लागल्या आहेत. कदंब महामंडळाने स्वीडनच्या स्कॅनिया या कंपनीशी यासाठी सहकार्याचा करार केला असून बायोगॅसवर चालणारी एक आणि बायो इथॅनॉलवर चालणाऱ्या दोन बसगाड्यांची सुरवात राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांच्या हस्ते करण्यात आली.

या बसगाड्यांचा प्रयोग यशस्वी झाल्यास प्रदूषण निर्मूलनाच्यादृष्टिने तो मैलाचा दगड ठरणार आहे. याच कंपनीच्या बायो इथॅनॉलवर चालणाऱ्या बसेस सध्या नागपूर महापालिकेच्या ताफ्यात आहेत.

पूर्णपणे वातानुकुलीत असलेली ही बस ३७ आसनी असून इंजिन मागील बाजूस आहे. बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. आणि जीपीएस सिस्टम असल्याने बस नेमकी कुठे आहे हे ट्रॅक केली जाऊ शकते. या बसचे खास वैशिष्ट्य म्हणजे दिव्यांगांना किंवा ज्येष्ठ नागरिकांना बसमध्ये चढण्या-उतरण्यासाठी सोयीचे व्हावे याकरिता अशी व्यवस्था आहे की बसचे फ्लोरिंग खाली घेता येते. गतिरोधक आला किंवा रस्त्यावर पावसाचे पाणी साचलेले असल्यास फ्लोरिंग एक फूट वर घेता येते.

साधारणपणे एक टन कच-यापासून २५ क्युबिक मिटर बायोगॅस तयार होतो. प्रती क्युबिक मिटर साधारणपणे अडीच किलोमिटर बस धावू शकते. याचाच अर्थ २५ क्युबिक मिटर गॅस इंधन म्हणून वापरला तर त्यातून ६0 ते ६२ किलोमिटर मायलेज मिळू शकते. कदंब महामंडळाचा हा प्रयोग यशस्वी झाल्यास ती एकप्रकारची हरित क्रांती ठरणार आहे. गोव्यात साळगाव येथे कचऱ्यावर प्रकीया करणारा प्रकल्प उभारण्यात आला आहे . तेथे पुरेसा बायोगॅस उपलब्ध आहे . सध्या त्या बायोगॅस ने वीजनिर्मिती केली जाते .

Web Title: Buses running on biogas today in Goa