
Uttar Pradesh : एका मोबाईलवर दोन बीअर फ्री; अनोखी शक्कल दुकानदाराला पडली महागात
माल खपवण्यासाठी आणि ग्राहकांना आकर्षित करुन घेण्यासाठी दुकानदार एकावर एक फ्री, दोन फ्री, अशा विविध ऑफर देत असतात. त्यात काही नवीन नाही. पण उत्तर प्रदेशातल्या एका दुकानदाराने एका मोबाईलवर बीअर फ्री देण्याची ऑफर आणली आहे. पण ही ऑफर त्या दुकानदाराला महागात पडली आहे.
उत्तर प्रदेशातल्या भदोही जिल्ह्यामध्ये राजेश मौर्य या दुकानदाराचं मोबाईल फोनचं दुकान आहे. या दुकानदाराने आपल्या दुकानाबाहेर एका स्मार्टफोनच्या खरेदीवर दोन बीअर कॅन मोफत अशी ऑफर दिली होती. या ऑफरचे पोस्टर्सही लावले होते. ३ मार्च ते ७ मार्च काळामध्ये होळीनिमित्त ही ऑफर देण्यात आली होती.
ही ऑफर सुरू केल्यानंतर मौर्य यांच्या दुकानाबाहेर मोठी रांग लागली. त्यानंतर ही गोष्ट पोलिसांच्या निदर्शनास आली आणि पोलिसांनी ही ऑफर फार काळ चालू दिली नाही. ही ऑफर ऐकल्यानंतर पोलिसांनी या दुकानाबाहेरची गर्दी हटवली आणि त्याचं दुकानही सील केलं. त्यानंतर भारतीय दंड संहितेच्या कलम १५१ नुसार, सामाजिक शांतता भंग केल्याप्रकरणी या दुकानदारावर गुन्हा दाखल कऱण्यात आला.