राफेल खरेदी हा शुद्ध गैरव्यवहार 

2rafel.jpg
2rafel.jpg

नवी दिल्ली : राफेल विमान खरेदीप्रकरणी कॉंग्रेसने मोदी सरकारविरोधातील हल्ला आणखी तीव्र केला आहे. फ्रान्ससोबतच्या गुप्त कराराच्या नावाखाली राफेल विमानाच्या किमतीवरून संसदेची दिशाभूल करण्यात आली, असा आरोप करताना कॉंग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्याविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव आणण्याची घोषणा आज केली. राफेल खरेदी हा शुद्ध गैरव्यवहार असल्याचीही तोफ कॉंग्रेसने डागली. 

लोकसभेमध्ये अविश्‍वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान राहुल गांधींनी राफेल प्रकरणावरून केलेल्या आरोपांनंतर कॉंग्रेस आणि सत्ताधारी भाजपमध्ये जोरदार जुंपली होती. पाठोपाठ राहुल गांधींनी काल ट्‌विट करून "राफेल खरेदीत खरोखर गैरव्यवहार झाला आहे', असा पुन्हा हल्ला चढवला होता. त्यानंतर कॉंग्रेसने आज पुन्हा आक्रमक पवित्रा घेत सरकारच्या दाव्यांना लक्ष्य केले. 

राफेलच्या किमतीबाबत डसॉल्ट एव्हिएशन या विमान उत्पादक कंपनीने वार्षिक अहवालात केलेला खुलासा, संरक्षणमंत्र्यांनी लोकसभेत 18 नोव्हेंबर 2016 ला आणि राज्यसभेत 19 मार्च 2018 ला लेखी प्रश्‍नांच्या उत्तरात एका विमानाची "सुमारे 670 कोटी रुपये' अशी सांगितलेली किंमत आणि फ्रेंच सरकारशी झालेल्या गुप्ततेच्या करारामध्ये किमतीचा तपशील जाहीर न करण्याबाबतचा कोठेही उल्लेख नसणे, या मुद्‌द्‌यांवरून माजी संरक्षणमंत्री ए. के. अँटनी, माजी मंत्री आनंद शर्मा आणि मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत मोदी सरकारला धारेवर धरले. 

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी संरक्षणमंत्री ए. के. अँटनी म्हणाले, की भारत आणि फ्रान्सदरम्यान 2008मध्ये झालेल्या करारात विमानाच्या किमतींचा खुलासा करता येणार नाही, असे कुठेही म्हटलेले नाही. त्यामुळे सरकार राफेल कराराच्या किमती लपवू शकत नाही. कॅग आणि लोकलेखा समितीद्वारे या प्रकरणाची तपासणी होईल. कराराच्या गुप्ततेसंबंधीच्या तरतुदीचा सरकारचा दावा पूर्णपणे खोटा आहे. 

कॉंग्रेस नेते आनंद शर्मा म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी विमानाच्या किमतीवरून देशाची दिशाभूल का केली, हे संसदेत सांगणे सरकारची जबाबदारी आहे. पंतप्रधान आणि संरक्षणमंत्र्यांनी विशेषाधिकारांचे उल्लंघन केले असल्याने त्यांच्याविरुद्ध लोकसभेत हक्कभंग प्रस्ताव आणला जाईल. मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी लोकसभा आणि राज्यसभेत संरक्षण खात्याने दिलेल्या उत्तरात राफेल विमानांची सुमारे किंमत 670 कोटी रुपये दर्शविल्याकडे लक्ष वेधले. तसेच फ्रेंच सरकार व डसॉल्ट कंपनीला विमानांचा दर सांगण्यास कोणताही आक्षेप नसताना पंतप्रधान व संरक्षणमंत्री का दिशाभूल करत आहेत, असा सवाल केला. 

भाजपचाही हक्कभंग प्रस्ताव 
दरम्यान, राफेल प्रकरणावरून कॉंग्रेस आणि भाजपचे आता हक्कभंग युद्ध सुरू झाले आहे. भाजपने कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरुद्ध लोकसभेत हक्कभंग प्रस्तावाची नोटीस दिली आहे. मात्र, लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी या नोटिशीचे अध्ययन करून निर्णय केला जाईल, असे स्पष्ट केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com