‘सीएए’विरोधकांची एकजूट करणार - प्रकाश आंबेडकर

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

दिल्ली प्रारंभबिंदू ठरेल! 
दिल्ली विधानसभेच्या निकालांबद्दल आंबेडकर म्हणाले की दिल्लीकरांनी दिलेला निर्णय हा देशासाठी चांगला संकेत आहे. दिल्लीच नव्हे तर देशातील सर्व सभ्य नागरी समाज गोळ्या व बंदुकांची ‘आरएसएस’प्रणित भाषा अमान्य करत आहेत. दिल्लीत आम आदमी पक्षाचा विजय व भाजपचा पराभव हा राष्ट्रीय पातळीवर किती परिणामकारक ठरेल हे आता सांगता येणार नाही. मात्र मनुवादी शक्तींना निर्णायकरित्या हरविण्याचा हा प्रारंभबिंदू ठरू शकतो.

नवी दिल्ली - ‘मोदी सरकारने आणलेला सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) तसेच प्रस्तावित ‘एनपीए’ व ‘एनआरसी’ हे सारे कायदे केवळ अल्पसंख्याकच नव्हेत तर देशातील दलित व शोषितांच्या विरुद्ध रचलेले भयानक कारस्थान असून याच्या विरोधात देशभरात आंदोलन करणाऱ्या विविध संघटना व कार्यकर्त्यांना एकत्र आणण्याची नितांत गरज आहे. यादृष्टीने देशभरातील ३५ संघटनांतर्फे ४ मार्चला नवी दिल्लीत ‘सीएए’विरोधी आंदोलन करणार आहेत,’’ अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी येथे दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दिल्लीतील प्रस्तावित परिषदेचे निमंत्रक असलेले आंबेडकर यांना, कोणत्या संघटना व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत असे विचारता त्यांनी, दिल्लीतील शाहीनबागेतील आंदोलकांसह ‘सीएए’विरोधी आंदोलनात उतरलेले सारेच सहभागी होणार आहेत. मात्र सरकारच्या दडपशाहीमुळे आता त्यांची नावे जाहीर करणार नसून थेट मंचावरच येतील असे सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CAA will unite opponents prakash ambedkar