मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत गोव्यात मंत्रिमंडळाची फेररचना

अवित बगळे
सोमवार, 24 सप्टेंबर 2018


भाजपने आजारी मंत्र्यांना वगळावे असा सूर पक्षातीलच आमदार व्यक्त करत होते. सध्याच्या मंत्रिमंडळात भाजपचे पाच, गोवा फॉरवर्डचे तीन, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे दोन आणि दोन अपक्ष असे एकूण 12 मंत्री आहेत. विधानसभेची सदस्यसंख्या 40 असल्याने जास्तीत जास्त 12 जणांचेच मंत्रिमंडळ असू शकते.

पणजी- गोवा मंत्रिमंडळातून आज नगरविकासमंत्री फ्रांसिस डिसोझा आणि वीजमंत्री पांडूुरंग मडकईकर यांना डच्चू देण्यात आला. डिसोझा सध्या न्यूयॉर्क येथे उपचार घेत आहेत तर मडकईकर अडीच महिन्यापासून मुंबईच्या कोकीलाबेन अंबानी रुग्णालयात आहेत. त्यांच्याजागी मिलींद नाईक आणि नीलेश काब्राल यांना मंत्रिपदे देण्यात आली आहेत. विशेष म्हणजे या शपथविधी समारंभाला मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर उपस्थित नव्हते. याशिवाय सरकारचा प्रतिनिधी म्हणून कोणी ज्येष्ठ मंत्रीही मंचावर नव्हते.

भाजपने आजारी मंत्र्यांना वगळावे असा सूर पक्षातीलच आमदार व्यक्त करत होते. सध्याच्या मंत्रिमंडळात भाजपचे पाच, गोवा फॉरवर्डचे तीन, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे दोन आणि दोन अपक्ष असे एकूण 12 मंत्री आहेत. विधानसभेची सदस्यसंख्या 40 असल्याने जास्तीत जास्त 12 जणांचेच मंत्रिमंडळ असू शकते.

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर स्वादुपिंडावरील आजारावरील उपचारासाठ आजवर ते तीनवेळा अमेरेकेला गेले असून सध्या एम्समध्ये उपचार घेत आहेत. डिसोझा यांच्यावर गेल्या महिनाभऱापासून न्यूयॉर्कमध्ये उपचार सुरु असून मडकईकर याना पक्षाघाताचा झटका आल्यापासून ते अंथरूणाला खिळून आहेत. त्यामुळे आजारी मंत्र्यांना वगळण्यात आले तर मुख्यमंत्री आजारी आहेत त्याचे काय असा प्रश्न विचारला जात आहे.

मंत्रिमंडळातील दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांना विचारले असता ते म्हणाले, कोणाला मंत्रिमंडळात ठेवायचे, कोणाला नाही हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. मुख्यमंत्री आजारी आहेत असे म्हणत असाल तर तमीळनाडूच्या जयललिता दीड वर्षे आजारी होत्या. त्याचा बाऊ कोणी केला नाही. मग गोव्याच्याच मुख्यमंत्र्यांचा विषय़ चर्चेत का ? येतोय असा प्रतिप्रश्न त्यांनी केला.

मंत्रिमंडळातून वगळण्यात आलेले डिसोझा आजच्या या निर्णयांने व्यथित झाले आहेत. भाजपसोबत 20 वर्षे राहिल्याचे बक्षिस आज मिळाल्याची प्रतिक्रीया त्यांनी व्यक्त केली. त्यांनी मुद्दामहून पत्रकारांशी दूरध्वनीवर संपर्क साधला. खरेतर गेल्या वर्षी संरक्षणमंत्रीपद सोडून पर्रीकर यांनी मुख्यमंत्रीपदी येण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांना म्हापसा या मतदारसंघातून निवडणूक लढवायची होती. पर्रीकर यांचे मूळ घर म्हापसा शहरात आहे. पर्रीकर आजवर पणजी या राजधानीच्या शहराच्या मतदारसंघातून निवडून येत आहेत. डिसोझा हे म्हापशाचे गेली तीस वर्षे प्रतिनिधीत्व करत आहेत. त्यांनी राज्यपालपद हवे तर स्वीकारावे पण राजीनामा देऊन पर्रीकर यांच्यासाठी तो मतदारसंघ उपलब्ध करावा असे त्यांना सांगण्यात आले होते. मात्र त्यांनी तसे करण्यास नकार दिला होता. त्याचमुळे या सरकारमध्ये त्यांना उपमुख्यमंत्रीपदाचा दर्जाही मिळाला नव्हता. मागच्या भाजप सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री होते.

भाजपने आज मंत्रिमंड़ळात समावेश केलेले मिलींद नाईक हे भंडारी समाजाचे आहेत. गोव्यात इतर मागासवर्गीयांचे प्रमाण 19 टक्के आहे. त्यात 60 टक्के प्रमाण भंडारी समाजाचे आहे. केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांना मुख्यमंत्री करा अशी मागणी बहुजन महासंघ आणि भंडारी समाजाने केली होती. ती मार्ग पूर्ण न करता आल्याने नाईक यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन भंडारी सामाजाला भाजपने प्रतिनिधीत्व दिले आहे. त्याशिवाय गृहनिर्माणमंत्री जयेश साळगावकर हे गोवा फॉरवर्डचे आमदार हेही भंडारी समाजाचे आहेत.

नीलेश काब्राल हे कु़डच़ड्याचे आमदार आहेत. चर्चने भाजपविरोधी जेव्हा जेव्हा सूर आळवला तेव्हा धर्मसत्तांनी राजकारणात लुडबूड करू नये असे जाहीरपणे सुनावणारे अशी त्यांची छबी आहे. पर्रीकर यांना मुख्यमंत्री झाल्यानंतर पोट निवडणुकीत निवडणूक येण्यासाठी सुरक्षित मतदारसंघाचा शोध होता. त्यावेळी काब्राल यांनी जाहीरपणे त्यांच्यासाठी आमदारकीचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. त्यानंतर पर्रीकर यांनी कुडचडे येथे जाऊन तेथील जनतेचे आभार मानतानाच आपल्या पणजी मतदारसंघाप्रमाणेच कु़डच़डे मतदारसंघातील जनतेलाही विकास करून देऊ अशी ग्वाही दिली होती.

त्यामुळे पर्रीकर यांनी काब्राल यांच्या निष्ठेची मंत्रिपदाच्या रुपाने बक्षिसी दिल्याचे मानले जात आहे. तर मिलींद यांच्या रुपाने भंडारी समाजाला आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही मंत्रीपदासाठी इच्छूक असलेले उपसभापती मायकल लोबो पुढे काय करतात यावर राजकारणाची दिशा सध्या तरी अवलंबून आहे.

Web Title: Cabinet reshuffle in Goa in absence of Chief Minister parrikar