नवी दिल्ली : सियाचीन, लडाख आणि डोकलाम अशा आव्हानात्मक बर्फाच्छादित ठिकाणांवर तैनात असलेल्या भारतीय लष्करातील जवानांना आवश्यक कॅलरीचे अन्न, विशेष कपडे, चष्मे, बूट आणि अन्य उपकरणे मिळत नसल्याचे महालेखापालांच्या (कॅग) अहवालातून समोर आले आहे.
कॅगने सोमवारी लोकसभेत याबाबतची माहिती उघड करताच लष्करातील जवानांना मिळणाऱ्या सोई-सुविधांवरून पुन्हा एकदा सरकारला विरोधी पक्षांकडून लक्ष्य करण्यात आले. जवानांना आवश्यक त्या वस्तू मिळण्याबाबत संरक्षण मंत्रालयाने कॅगला माहिती दिली, की उंच ठिकाणी तैनात असलेल्या जवानांना पुरविण्यात येणाऱ्या वस्तूंची कमतरता असून, लवकरच या सर्व गोष्टी त्यांना पुरविण्यात येतील.
लष्कराच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, की कॅगचा हा अहवाल 2015-16 आणि 16-17 या वर्षातील आहे. त्यानंतर परिस्थितीत सुधारणा झाली आहे. सियाचीनसारखी ठिकाणे 16 ते 22 हजार फुटांवर आहेत. त्याठिकाणी आवश्यक ते कपडे, उपकरणांची कमतरता आहे. याठिकाणी राहणाऱ्या प्रत्येक जवानाच्या कपड्यांवर साधारण 1 लाख रुपये खर्च होतात.
यावरून काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी भाजप सरकारवर टीका केली आहे. सुरजेवाला म्हणाले, की लष्कराच्या नावावर मते मागणारे त्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांपासून तोंड फिरवत आहेत. कॅगच्या अहवालामुळे भाजपच्या खोट्या राष्ट्रवादाचा बुरखा फाटला आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.