बदामाचा व्यापार ठरतोय दहशतवाद्यांचा आधार

वृत्तसंस्था
शुक्रवार, 19 एप्रिल 2019

- कॅलिफोर्नियाचा बदाम हा दहशतवाद्यांसाठी ठरतोय आर्थिक आधार
- भारत-पाक सीमेवरून चालणाऱ्या व्यापारामध्ये हा बदाम महत्त्वाचा घटक
- व्यापारातून मिळालेला पैसा व्यापारी दहशतवादी आणि फुटीरतावाद्यांना देत असल्याचे उघड

नवी दिल्ली : जगभर उच्च पोषण मूल्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या कॅलिफोर्नियाचा बदाम हा दहशतवाद्यांसाठी आर्थिक आधार ठरत असल्याचे उघड झाले आहे. भारत-पाकिस्तानदरम्यान सीमेवरून चालणाऱ्या व्यापारामध्ये हा बदाम एक महत्त्वाचा घटक असून, या व्यापारातून मिळालेला अतिरिक्त पैसा व्यापारी दहशतवादी आणि फुटीरतावाद्यांना देत असल्याचे उघड झाले आहे. 

भारताने दोनच दिवसांपूर्वी भारत-पाकिस्तान सीमेवरील व्यापार थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. यामार्गेच भारतात शस्त्रे, अमली पदार्थ येत असल्याचे उघड झाले होते. अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये उत्पादित होणाऱ्या बदामाचा सीमेवरून मोठ्या प्रमाणावर व्यापार चालतो. भारतातील अनेक व्यापारी हे बदाम चढ्या किमतीला विकून अमाप पैसा कमावतात. हाच पैसा पुढे दहशतवादी, फुटीरतावादी आणि देशविरोधी घटकांच्या हाती पडत असल्याचे उघड झाले आहे.

काश्‍मीर खोऱ्यातील फुटीरतावाद्यांनाही याच माध्यमातून आर्थिक बळही मिळते. या व्यापारामध्ये सहभागी असलेल्या काही मंडळींचा प्रतिबंधित दहशतवादी संघटना हिज्बुल मुजाहिदीनशी संबंध असल्याचे तपास संस्थांना आढळून आले आहे. 

पाक कनेक्‍शन 
दहशतवादी संघटनांमध्ये सहभागी होण्यासाठी पाकिस्तानात गेलेल्या काही मंडळींनी तेथेच व्यापार सुरू केल्याचेही आढळून आले आहे. पाकिस्तानातील अनेक व्यापारी संस्थांवर दहशतवादी संघटनांचा कब्जा आहे. हीच मंडळी भारतातील त्यांच्या चेल्यांशी व्यापार करीत असल्याचे आढळून आले आहे.

Web Title: California Almonds Used In Cross LoC Trade For Terror Funding