ऍट्रॉसिटी कायद्यातील बदल रद्द करा - रामविलास पासवान

वृत्तसंस्था
रविवार, 3 जून 2018

ऍट्रॉसिटी कायद्यातील काही कलमे कमकुवत करणारा न्यायालयाचा निकाल रद्द करण्यासाठी सरकारने तातडीने अध्यादेश काढण्याची गरज आहे. 
 - रामविलास पासवान, केंद्रीय मंत्री व लोकजनशक्ती पक्षाचे अध्यक्ष 

 

नवी दिल्ली - ऍट्रॉसिटी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी नव्याने लागू केलेली मार्गदर्शक तत्त्वे मागे घेण्याची मागणी केंद्रीय मंत्री आणि लोकजनशक्ती पक्षाचे नेते रामविलास पासवान यांनी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे केली आहे. पासवान आणि त्यांचे पुत्र खासदार चिराग पासवान यांनी आज शहा यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. 

दलितांना असलेले बढतीमधील आरक्षण कायम ठेवण्यासाठी पावले उचलण्याची मागणीही पासवान यांनी या वेळी केली; तसेच बिहार हे देशातील सर्वांत गरीब राज्यांपैकी एक आहे, त्यामुळे बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्याची विनंतीही पासवान यांनी केली. आपल्या मागण्यांवर शहा यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे पासवान यांनी स्पष्ट केले. 

ऍट्रॉसिटी कायदा कमकुवत झाल्यामुळे दलितांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचा दावा जवळजवळ सर्वच राजकीय पक्षांकडून केला जात आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार केला जावा, अशी मागणी करत केंद्राने पुनर्विचार याचिका दाखल केली आहे.

Web Title: Cancel the change in atrocity