चीन सीमेपर्यंत सी-17 ची झेप

पीटीआय
शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016

मेचुका धावपट्टीवर उतरले ग्लोबमास्टर

इटानगर - जगातील सर्वांत मोठे मालवाहू विमान म्हणून ओळख असलेले सी-17 ग्लोबमास्टर हे विमान आज प्रथमच येथील विकसित केलेल्या मेचुका धावपट्टीवर उतरले. यामुळे या पर्वतीय प्रदेशामध्ये वेगाने मालवाहतूक करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना मोठे बळ मिळाले आहे.

मेचुका धावपट्टीवर उतरले ग्लोबमास्टर

इटानगर - जगातील सर्वांत मोठे मालवाहू विमान म्हणून ओळख असलेले सी-17 ग्लोबमास्टर हे विमान आज प्रथमच येथील विकसित केलेल्या मेचुका धावपट्टीवर उतरले. यामुळे या पर्वतीय प्रदेशामध्ये वेगाने मालवाहतूक करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना मोठे बळ मिळाले आहे.

समुद्र सपाटीपासून तब्बल 6,200 फूट उंचीवर असलेली ही धावपट्टी चीनच्या सीमेपासून केवळ 29 किमी अंतरावर आहे. या धावपट्टीची लांबीही केवळ 4,200 फूटच आहे. या परिस्थितीत हवाई दलाने हे महाकाय विमान येथे यशस्वीरीत्या उतरवून मोठे यश मिळविले आहे. "भारतीय हवाई दलाने ही फार मोठी उडी मारली आहे. यामुळे अत्यंत दुर्गम अशा या भागात साहित्य आणि मनुष्यबळ यांची वेगाने वाहतूक करणे सोपे जाणार आहे,' असे हवाई दलाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. आपत्कालीन परिस्थिती उद्‌भवल्यास सी-17 च्या मदतीने मदतकार्याला वेग येऊ शकतो.

अत्यंत मोक्‍याच्या जागी असलेले मेचुका हे 1962 च्या चीनबरोबरील युद्धावेळी भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे होते. या ठिकाणी हवाई दलाने 1962 पासूनच डाकोटा विमानांच्या साह्याने काम करण्यास सुरवात केली. यानंतर हवाई दलाने येथे 2013 पर्यंत अँटोनोव्ह-32 (एएन-32) हे विमान वापरले. या ठिकाणापासून सर्वांत जवळचे मुख्य ठिकाण पाचशे किमीवरील दिब्रुगढ असून, तेथे जाण्यासाठी दरड कोसळणे, पाऊस अशी संकटे न आल्यास दोन दिवस लागतात. भारतातील इतर विकसित धावपट्ट्यांवरही हे विमान उतरविण्याचा हवाई दलाचा विचार आहे.

Web Title: Capacity of C-17 is upto Chinas Border