काश्‍मीरमध्ये महामार्गावर गाडीचा स्फोट; 'पुलवामा'ची पुनरावृत्ती टळली? 

वृत्तसंस्था
शनिवार, 30 मार्च 2019

'सीआरपीएफ'च्या वाहनांचा ताफ्यातील शेवटच्या गाडीला बनिहालजवळ एका सॅन्ट्रो गाडीने मागून धडक दिली. त्यात ती गाडी जळून खाक झाली. त्या गाडीतून एक सिलिंडरही सापडला. त्या गाडीचा चालक घटनास्थळावरून पळून गेला. 

श्रीनगर : जम्मू-श्रीनगर महामार्गावर बनिहाल येथे एका गाडीमध्ये आज (शनिवार) सकाळी साडेदहाच्या सुमारास स्फोट झाला. यामुळे या महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. विशेष म्हणजे, हा स्फोट झाला, तेव्हा 'सीआरपीएफ'च्या वाहनांचा ताफा त्याच रस्त्यावरून जात होता. ही गाडी त्या ताफ्यातील एका वाहनाला धडकली. त्यामुळे पुन्हा एकदा पुलवामा येथे 'सीआरपीएफ'च्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यासारखा प्रयत्न होता का, अशा चर्चांना उधाण आले आहे. 

'सीआरपीएफ'च्या वाहनांचा ताफ्यातील शेवटच्या गाडीला बनिहालजवळ एका सॅन्ट्रो गाडीने मागून धडक दिली. त्यात ती गाडी जळून खाक झाली. त्या गाडीतून एक सिलिंडरही सापडला. त्या गाडीचा चालक घटनास्थळावरून पळून गेला. 

या घटनाक्रमामुळे या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 'सीआरपीएफ'च्या गाडीचे किरकोळ नुकसान झाले आहे; पण सुदैवाने कुठहीही जीवितहानी झालेली नाही. या अपघाताची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

पुलवामा येथे गेल्या महिन्यात एका आत्मघाती दहशतवाद्याने सीआरपीएफच्या वाहनाला गाडी धडकावून हल्ला केला होता. त्यात 40 जवान हुतात्मा झाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Car explodes near Banihal in Kashmir CRPF Bus damaged