लालूप्रसादांना "प्राप्तिकर'चा दणका

पीटीआय
मंगळवार, 20 जून 2017

आवाज दाबू शकतील, इतकी भाजपमध्ये ताकद नाही. माझा आवाज दाबू पाहाल, तर देशभरातून करोडो लालू आवाज उठवतील. कोल्हेकुईला मी घाबरत नाही...

नवी दिल्ली - प्राप्तिकर विभागाने आज राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबातील सहा जणांविरुद्ध बेनामी गैरव्यवहार कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदविला. प्राप्तिकर विभागाने लालूप्रसाद यांच्या पत्नी आणि बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडीदेवी, मुलगा आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्विनी यादव, मुलगी खासदार मिसा भारती, मिसा यांचे पती शैलेश, मुली रागिनी आणि चंदा यांच्या संपत्तीवर जप्तीच्या नोटिसा बजावल्या आहेत.

एक हजार कोटी रुपयांच्या बेनामी जमीन गैरव्यवहार आणि करचुकवेगिरी प्रकरणाचा प्राप्तिकर विभागातर्फे तपास सुरू आहे. या गैरव्यवहारांमध्ये लालूप्रसाद यांच्या कुटुंबीयांचा समावेश असल्याचा आरोप आहे. प्राप्तिकर विभागाने कालच (ता. 19) या प्रकरणी काही मालमत्तांवर तात्पुरती टाच आणली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज टाच आणलेल्या सर्व मालमत्ता बेनामी असून, गेल्या महिन्यात घातलेल्या छाप्यांमधून मिळालेल्या माहितीच्या आधारावरच ही कारवाई झाली आहे. प्राप्तिकर विभागाने दिल्ली आणि पाटणामधील 9.32 कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. सध्याच्या बाजारभावाप्रमाणे या मालमत्तेची किंमत 180 कोटी रुपयांच्या आसपास आहे.

केंद्र सरकारने गेल्या वर्षी 1 नोव्हेंबरपासून बेनामी गैरव्यवहार कायद्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. बेनामी मालमत्ता म्हणजे, मालमत्ता एकाच्या नावावर असते आणि फायदा दुसऱ्याच व्यक्तीला मिळतो. या कायद्याअंतर्गत दोषींना सात वर्षे तुरुंगवास आणि मोठा दंड अशा शिक्षेची तरतूद आहे. यादव कुटुंबीयांशी संबंधित असलेले चार्टर्ड अकाउंटंट राजेशकुमार अगरवाल यांनाही सक्तवसुली संचालनालयाने गेल्या महिन्यात अटक केली आहे. लालूप्रसाद यादव यांनी मात्र आपल्या कुटुंबीयांवरील सर्व आरोप फेटाळले असून, हे राजकीय कारस्थान असल्याचा दावा केला आहे. भाजपने मात्र हे आरोप न्यायालयात सिद्ध होतील, अशी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच राबडीदेवी यांच्या नावावर एकूण वीस कोटी रुपये मूल्य असलेल्या 18 सदनिका असल्याचाही आरोप भाजप नेते सुशीलकुमार मोदी यांनी केला आहे.

आवाज दाबू शकतील, इतकी भाजपमध्ये ताकद नाही. माझा आवाज दाबू पाहाल, तर देशभरातून करोडो लालू आवाज उठवतील. कोल्हेकुईला मी घाबरत नाही.
- लालूप्रसाद यादव, राजद प्रमुख

Web Title: Case registered against Lalu