चलनाचा पुरवठा आता चौपट वेगाने

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 डिसेंबर 2016

इतर बॅंकांना होणाऱ्या चलन पुरवठ्यामध्ये नक्कीच सुधारणा होईल. 500 रुपयांच्या नोटांचा हवाई मार्गाने पुरवठाही करण्यात येत आहे. सध्या यासंदर्भात दबाव निर्माण झाला असला; तरी काहीच दिवसांत परिस्थिती निवळेल

नवी दिल्ली - देशभरातील बॅंकांमध्ये रोख चलनाच्या असलेल्या तुटवड्याची दखल घेत केंद्र सरकारने 500 रुपयांच्या नोटा छापण्याचा वेग आणखी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. जलद गतीने छापण्यात येत असलेल्या या नव्या नोटांमुळे सध्या असलेली तणावग्रस्त परिस्थिती येत्या काही दिवसांत निवळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आहे. या नव्या निर्णयामुळे चलनाचा पुरवठा सध्यापेक्षा चौपट होणार आहे.

चलनाच्या तुटवड्याचा सर्वाधिक फटका खासगी बॅंकांना बसला आहे. या पार्श्‍वभूमीवर नोटा छापणारे देशभरातील चार प्रेस कारखाने आता तीन पाळ्यांमध्ये (शिफ्ट) कार्यरत करण्यात आले असून यावेळेत जास्तीत जास्त काम चलन उपलब्ध निर्माण करण्याचा सरकारचा यत्न आहे. याआधी हे चारही कारखाने दोन पाळ्यांमध्ये काम करत होते. या चार कारखान्यांपैकी म्हैसूर आणि सालबोनी येथील कारखाने हे भारतीय रिझर्व्ह बॅंकेच्या मालकीचे आहेत; तर नाशिक व देवासमधील कारखाने केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली आहेत. या चारही कारखान्यांनी 500 रुपयांच्या नोटा छापण्यावर सर्वाधिक भर दिला असल्याचे सूत्रांनी सांगितले.

चलनाच्या तुटवड्यामुळे देशभरात रिकामी एटीएम मशिन्स आणि मोठमोठ्या रांगा असे चित्र पहावयास मिळाले. मात्र लवकरच ही समस्या दूर होण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे.

"इतर बॅंकांना होणाऱ्या चलन पुरवठ्यामध्ये नक्कीच सुधारणा होईल. 500 रुपयांच्या नोटांचा हवाई मार्गाने पुरवठाही करण्यात येत आहे. सध्या यासंदर्भात दबाव निर्माण झाला असला; तरी काहीच दिवसांत परिस्थिती निवळेल,'' असे एका सरकारी अधिकाऱ्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले.

या पार्श्‍वभूमीवर, खासगी बॅंकांनी सॅलरी अकाऊंट असलेल्या कंपन्यांना इलेक्‍ट्रॉनिक माध्यमामधून पैसे हस्तांतरित करण्याचे प्रयत्नही सुरु केले आहेत.

Web Title: cash supply hiked by 4 times