मोदींच्या 'त्या' गुहेत जायचंय, मग एवढे पैसे भरा!

वृत्तसंस्था
सोमवार, 20 मे 2019

लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर आणि अखेरच्या टप्प्यातील मतदानाला सुरवात होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी केदारनाथ दौऱ्यावर पोहोचले. केदारनाथ मंदिराच्या डाव्या बाजूच्या डोंगरात असलेल्या एका गुहेत त्यांनी ध्यानधारणा केली. ही गुहा पाच मीटर लांब आणि तीन मीटर रुंद आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केदारनाथ दर्शनानंतर मुक्काम केलेली गुहा आता भाड्याने देण्यात येणार आहे. या गुहेत एक दिवस राहण्याचा खर्च 990 रुपये इतका असणार आहे.

लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर आणि अखेरच्या टप्प्यातील मतदानाला सुरवात होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी केदारनाथ दौऱ्यावर पोहोचले. केदारनाथ मंदिराच्या डाव्या बाजूच्या डोंगरात असलेल्या एका गुहेत त्यांनी ध्यानधारणा केली. ही गुहा पाच मीटर लांब आणि तीन मीटर रुंद आहे. एप्रिल महिन्यात या गुहेच्या निर्मितीचं कार्य सुरू करण्यात आले होते. साडेआठ लाख रुपये इतका या गुहेच्या निर्मितीसाठी खर्च आला असून ‘रुद्र गुफा’ असे नाव देण्यात आले आहे. नेहरु इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनियरिंगने ही गुहा तयार केली आहे.

या गुहेप्रमाणेच आणखी 5 गुहांची निर्मिती करण्यात येणार आहे. एखाद्या व्यक्तीला ध्यानधारणेसाठी जास्तीत जास्त तीन दिवसांसाठी ही गुहा बूक करता येईल. आवश्यक असेल तरच कालावधी वाढवला जाईल. या ठिकाणी ध्यानधारणेसाठी येणाऱ्या भाविकांकडून 3 हजार रूपये प्रति दिवस असा दर निश्चित करण्यात आला होता. परंतु अल्प प्रतिसाद पाहता तो कमी करून 990 रूपये प्रति दिवस आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गढवाल मंडळ विकास निगमद्वारे या गुफेचे बुकींग भाविकांना करता येऊ शकते. तसेच बुकींग करणाऱ्या भाविकांची गुप्तकाशी आणि केदारनाथ अशा दोन ठिकाणी वैद्यकीय चाचणीही करण्यात येते. एकवेळच्या जेवणाची सोय देखील येथे केली जाते, मात्र त्यासाठी अतिरिक्त पैसे द्यावे लागतात. भाजपने मोदींच्या ध्यानधारणेनंतर कर्मयोगी असा उल्लेख त्यांचे फोटो ट्विट केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cave in which Narendra Modi meditated comes with electricity 24-hour attendant at Rs 990 a day