esakal | चिदंबरम 'सीबीआय'च्या जाळ्यात; रात्रीचा मुक्काम सीबीआय कार्यालयातच?
sakal

बोलून बातमी शोधा

CBI-Arrest-PChidambaram

चिदंबरम यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याने काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

चिदंबरम 'सीबीआय'च्या जाळ्यात; रात्रीचा मुक्काम सीबीआय कार्यालयातच?

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत बुधवारी (ता.21) माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या अटकेचा हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. सर्व कायदेशीर पर्याय संपुष्टात आल्यानंतर तब्बल तीस तासांनी बुधवारी रात्री उशिरा चिदंबरम हे काँग्रेस मुख्यालयात अवतरले. तेथे पत्रकार परिषद घेतल्यानंतर ते जोरबाग येथील त्यांच्या निवासस्थानी रवाना झाले; पण केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) पथकाने पाठलाग करत त्यांचे घर गाठले. तेथे घरामध्येच अधिकाऱ्यांनी त्यांची चौकशी करत पावणेदहाच्या सुमारास अटकही केली. या वेळी चिदंबरम यांना घरातून बाहेर काढताना पोलिस आणि 'सीबीआय'च्या अधिकाऱ्यांना काँग्रेस कार्यकर्त्यांच्या विरोधास सामोरे जावे लागले. 

चिदंबरम यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याने काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 'सीबीआय'च्या अधिकाऱ्यांनी या वेळी अक्षरशः इमारतीच्या कंपाउंडवरून उड्या घेत आत प्रवेश केला. याचवेळी अधिकाऱ्यांचे दुसरे पथक हे मागील दाराने आत घुसण्याचा प्रयत्न करत होते. तब्बल 95 मिनिटांच्या नाट्यानंतर सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी त्यांना अटक केली. तेथून पुढे चिदंबरम यांना सीबीआयच्या मुख्यालयामध्ये आणण्यात आले. आज रात्रभर चिदंबरम यांचा मुक्काम येथील मुख्यालयातच राहील अशी माहिती सूत्रांनी दिली. तत्पूर्वी कॉंग्रेसच्या मुख्यालयामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत चिदंबरम यांनी आपण कायद्यापासून पळून गेलो नव्हतो, असे स्पष्ट करत बाजू सावरून नेण्याचा प्रयत्न केला. आज दिवसभर चिदंबरम यांनी न्यायालयाकडून कायदेशीर दिलासा मिळावा म्हणून धावपळ केली. 

न्यायालयाकडून दिलासा नाही 
तत्पूर्वी आयएनएक्‍स मीडिया गैरव्यवहारप्रकरणी तपास संस्था चिदंबरम यांचा कसून शोध घेत असताना आज त्यांना सर्वोच्च न्यायालयाकडूनही दिलासा मिळू शकला नाही. सर्वोच्च न्यायालयाने आजही चिदंबरम यांच्या अटकपूर्व जामिनावर तातडीने सुनावणी घेण्यास नकार देत या प्रकरणाची सुनावणी शुक्रवारपर्यंत पुढे ढकलली आहे. या घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) त्यांच्याविरोधात लूकआउट नोटीस बजाविल्याने त्यांच्या परदेशगमनाची दारेही बंद झाली आहेत. 

या न्यायालयीन घडामोडींचे आज राजकीय वर्तुळातही पडसाद उमटले. कॉंग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्याप्रमाणेच 'द्रमुक'चे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन हे चिदंबरम यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरल्याचे चित्र पाहायला मिळाले. दरम्यान, दिल्ली उच्च न्यायालयाने चिदंबरम यांना मंगळवारी अटकेपासून संरक्षण देण्यास नकार दिल्यानंतर ते अचानक बेपत्ता झाले. केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) पथकाने दोनदा चिदंबरम यांच्या घराला भेट दिली होती; पण त्यांचा ठावठिकाणा लागला नव्हता.

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन 'सीबीआय'ने बुधवारी त्यांच्याविरोधात लूकआउट सर्क्‍युलर जारी केले. त्यानंतर चिदंबरम यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयामध्ये दोन्ही पक्षांकडून दावे-प्रतिदावे करण्यात आले. या आर्थिक गैरव्यवहाराची व्याप्ती ही खूप मोठी असल्याचा दावा 'सीबीआय'ने सर्वोच्च न्यायालयामध्ये केला. ज्येष्ठ विधिज्ञ आणि काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी तीन सदस्यीय खंडपीठासमोर चिदंबरम यांची बाजू मांडली. चिदंबरम हे स्वतः आपण पळून जाणार नाहीत, अशी हमी न्यायालयास द्यायला तयार आहेत असे सांगितले. पण, त्यावर न्यायालयाने आम्ही आताच यावर सुनावणी घेऊ शकत नाही, असे सांगितले.

न्या. एन. व्ही. रामण्णा, न्या. एम. शांतनागौडर आणि न्या. अजय रस्तोगी यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले. विशेष म्हणजे, सर्वोच्च न्यायालयात या न्यायाधीशांनी आज सकाळी या संदर्भातील याचिका सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याकडे पाठविली होती. सध्या सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील घटनापीठासमोर अयोध्येचा खटला सुरू असल्याने चिदंबरम यांच्या खटल्याच्या सुनावणीचा यादीत समावेश नव्हताच, असे सिब्बल यांनी सांगितले. 

मुक्काम सीबीआय कार्यालयातच?
सीबीआयने चिदंबरम यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना घेऊन ते सीबीआयच्या मुख्य कार्यालयात दाखल झाले. त्यापाठोपाठ डॉक्टरांची एक टीमही चिदंबरम यांच्या आरोग्य तपासणीसाठी सीबीआय कार्यालयात गेली आहे. 

उद्या (गुरुवार) दुपारी 2 वाजता सीबीआय न्यायालयात त्यांना हजर करण्यात येणार असल्याने त्यांचा बुधवारी रात्रीचा मुक्काम सीबीआय कार्यालयात होणार असून सीबीआय चिदंबरम यांची 14 दिवसांची कोठडी मागणार असल्याची अधिकृत माहिती सूत्रांनी दिली.

loading image