CBI ही आता सोशल मीडियावर! : ट्विटर, इन्स्टाग्रामवर उघडले खाते | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CBI is on social media

CBI ही आता सोशल मीडियावर! : ट्विटर, इन्स्टाग्रामवर उघडले खाते

नवी दिल्ली : सोशल मीडियापासून आजपर्यंत कटाक्षाने दूर राहणाऱ्या केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आता सोशल मीडियावर दाखल होण्याचे ठरविले आहे. इंटरपोलच्या आगामी आमसभेच्या पार्श्वभूमीवर सीबीआयने ट्विटर व इन्स्टाग्रामवर खाते उघडले आहे. या आमसभेत जगभरातील सुमारे १९५ देश सहभागी होणार असल्याने सीबीआयने ‘सोशल’ होण्याचे ठरविले आहे.

इंटरपोलची ही तीन दिवसांची आमसभा १८ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. सीबीआयने CBI_CIO या नावाने ट्विटर व इन्स्टाग्रामवर खाते उघडले आहे.

राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) व सक्तवसुली संचालनालय (इडी या केंद्रीय तपास संस्था यापूर्वीच सोशल मीडियावर दाखल झाल्या आहेत. मात्र, सीबीआयने प्रसिद्धिपत्रक जारी करण्याच्या अनेक वर्षे जुन्या कार्यपद्धतीलाच चिकटून राहणे पसंत केले होते. इंटरपोलच्या आगामी आमसभेमुळे सीबीआयला ही पारंपरिक चौकट मोडण्यास भाग पाडले आहे. या आमसभेत सायबर क्राइमसह इंटरनेटवर होणारा बाललैंगिक अत्याचाराच्या साहित्याचा प्रसार आदी मुद्यांवर भर असणार आहे. यामुळे सीबीआयने हा निर्णय घेतला.

भारताने १९९७ मध्ये इंटरपोलच्या आमसभेचे आयोजन केल्याने भारताला स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या पूर्वसंध्येला मतदानाद्वारे कार्यक्रम आयोजित करण्याची संधी देण्यात आली होती. यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी इंटरपोलचे सरचिटणीस जुर्गेन स्टॉक यांना प्रस्ताव पाठविला होता. स्टॉक यांनी भारत भेटीदरम्यान शहा यांची भेट घेतली होती.

इंटरपोलच्या आमसभेचे महत्त्व

आमसभा ही इंटरपोलची सर्वोच्च प्रशासकीय संस्था असून आमसभेतील १९५ सदस्य देशांचे प्रतिनिधी दरवर्षी एकत्र येतात. या प्रतिनिधींमध्ये संबंधित देशांचे मंत्री, पोलिस प्रमुख, अधिकारी किंवा त्या देशांच्या इंटरपोल केंद्रीय अन्वेषण विभागांच्या प्रमुखांचा समावेश असतो. आंतरराष्ट्रीय पोलिस संघटना अर्थात इंटरपोलचा भारत १९४९ पासून सदस्य आहे.